औरंगाबाद : मनोज जरांगे यांनी निवडून आणावं, पाडापाडीच्या भानगडीत पडू नये हे वडीलधारी आणि छत्रपती घरातील व्यक्ती या नात्याने सल्ला देतोय असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी समाजाचं नेतृत्व करावं आपण त्यांच्या पाठीशी असल्याचंही ते म्हणाले. तसेच राज्यात एकीकडे अतिवृष्टी सुरू आहे, शेतकरी हतबल आहे आणि दुसरीकडे कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात दंग असल्याची टीका त्यांनी धनंजय मुंडेंवर केली. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यासाठी संभाजीराजे पाहणी दौऱ्यावर आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी आधी जरांगेंना पाठिंबा दिला होता
मनोज जरांगे गरीब मराठ्यांसाठी लढा देतात म्हणून त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं संभाजीराजे म्हणाले. ते म्हणाले की, मनोज जरांगे हे छत्रपती शाहूंच्या पावलावर पाऊल टाकून चालतात. म्हणून आमचा त्यांना पाठिंबा राहील. पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर यांनीदेखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला होता.
मनोज जरांगेंनी समाजाचं नेतृत्व करावं
संभाजीराजे म्हणाले की, मी मनोज जरांगे यांना विनंती केली.आपण निवडणूक लढवली पाहिजे ती कुणाला पाडण्यासाठी नाही तर जिंकून येण्यासाठी. आमच्यासोबत नाही तर कुणासोबत तरी त्यांनी जायला हवं. अनेक टप्पे आहेत ते सुद्धा सकारात्मक आहेत. लवकरच त्यावर बैठक आणि चर्चा होईल. त्यांनी आमच्यासोबत यावं. तो यंग आणि डायनामिक माणूस आहे. मराठा समाजाचे नेतृत्व त्यांनी करावं या मताचा मी आहे. एवढी वर्षे मी नेतृत्व केलं, मलाही कॅपॅसिटी आहे. मनोज जरांगेंच्या पाठीमागे एवढे मोठे लोक आहेत. मराठा समाजाचा त्यांनी नेतृत्व करावं मी त्यांना सपोर्ट करतो.
राजेंद्र राऊत यांनी त्या लेव्हलला जाऊ नये
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांसाठी मनोज जरांगे यांनी लढा उभा केला आहे. ते प्रामाणिक आहेत. आता बार्शीच्या आमदारांनी असं का वक्तव्य केलं, या लेव्हलला त्यांनी का बोलावं याची कल्पना मला नाही. मला असं वाटतं की मनात जरांगे प्रामाणिकपणे काम करत आहेत. तर त्या लेव्हलला जाऊन बोलू नये. वातावरण गढूळ होतंय, ते करू नये असं माझं मत आहे.
सरकारने आपले कार्यक्रम थांबवून शेतकऱ्यांकडे पाहिलं पाहिजे
संभाजीराजे म्हणाले की, सकाळपासून अतिवृष्टी झाली त्या भागाची पाहणी केली. लोक व्यथित आणि चिंताग्रस्त आहेत. सरकारने पंचनामे करायला पाहिजे होते, ते झाले नाहीत. अजून लोकांपर्यंत काही पोहोचलं नाही. सरकारनं आपले सगळे कार्यक्रम थांबवून युद्ध पातळीवर शेतकऱ्यांना मदत करावी.
असा असंवेदनशील कृषिमंत्री पाहिला नाही
संभाजीराजेंनी यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, इतका असंवेदनशील कृषिमंत्री माझ्या जीवनात पहिल्यांदा पाहिला. सगळे आपापल्या परीने मदत करत असतात, मीही त्यातील एक आहे. मला शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचा वारसा आहे. माझ्या कामाची पोचपावची त्यांनी द्यायची गरज नाही. 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्राला कल्पना आहे की मी कसं काम करतो. मला सांगा त्यांना का झोंबलं?
संभाजीराजे म्हणाले की, राज्यातील शेतकरी एवढा अस्वस्थ असताना कृषिमंत्री दहा दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम परळीत घेतात. अशा परिस्थितीत हा अशोभनीय कार्यक्रम आहेत. त्यांना माझ्यासमोर येऊ दे मग सांगतो कोणते कोणते कार्यक्रम घेतले. माझ्याकडे त्यांच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आहेत. ते महाराष्ट्राला दाखवू का? ही आपली परंपरा आहे का? ही आपली संस्कृती आहे का? हे फुले, शाहू यांचे संस्कार आहेत का?
आमची तिसरी आघाडी नाही, सुसंस्कृत तिसरा पर्याय देण्याचा आमचा मानस असल्याचं संभाजीराजे म्हणाले. तोरणा किल्ला मुठभर मावळ्यांनी घेतला होता. ती सुरुवात आता झाली आहे. आम्ही का धाडस करू नये? का पर्याय देऊ नये? असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा: