Continues below advertisement

संभाजीनगर : समृद्धी महामार्ग आणि या महामार्गावरील अपघात (Accident) ही संशोधनाचा विषय बनला असून पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर (Samruddhi highway) अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात कार जळून खाक झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून कारमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र, या अपघातानंतर काही क्षण प्रवाशांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली होती. समृद्धी महामार्गावरुन करमाडकडे (Sambhajinagar) जाताना लाहुकी फाट्यावरील चौकात सोमवारी दुपारी 3 वाजता अपघाताची घटना घडली. याठिकाणचा हा तिसरा अपघात असून, हे गतिरोधक अपघाताला आमंत्रण ठरत आहेत, अशी ओरड प्रवाशांकडून होत आहे. त्यामुळे, येथे दिशादर्शक फलक किंवा इतर उपाययोजना करण्याची मागणीही प्रवाशांकडून केली जात आहे.

नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघालेली कार समृद्धी महामार्गावरुन करमाडकडे जात असता बनगाव लाहुकी फाट्यावरील चौकात कारचा अपघात झाला. कारचालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने वेगाने आलेली कार दुभाजकाला धडकून पुढे गेली, त्यानंतर काही वेळातच कारने अचानक पेट घेतला. अपघातानंतर प्रसंगावधानता राखत कारमधील पाच जणांनी लगेचच कारमधून बाहेर पलायन केले. त्यामुळे, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. या दुर्घटनेत संबंधित प्रवाशांपैकी काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. या थरारक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला आहे. अनिकेत दत्तात्रय झिरपे, दत्तात्रय गणपत झिरपे, केतकी दत्तात्रय झिरपे, कोमल अशोक गायकवाड आणि कल्पना अशोक गायकवाड असे या कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावे आहेत. या दुर्घटनेत हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

संभाजीनगर जालना महामार्गाच्या दिशेने येताना भरधाव कार बनगाव लाहुकी फाट्याजवळ येताच चालकाला गतिरोधकाचाअंदाज न आल्याने गतिरोधकावरून कार हवेत उडाली. त्यानंतर, चौकातील दुभाजकावर धडक बसल्याने कारने पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये असलेले 5 जण सुखरूप बाहेर पडले. मात्र, या अपघातात कार पूर्ण जळून खाक झाली आहे. काही वेळाने अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. पण, तोपर्यंत कार पूर्ण जळाली होती, या घटनेची नोंद करमाड पोलिसात करण्यात आली आहे.

हेही वाचा

आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल