छत्रपती संभाजीनगर : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनावर आहे. मात्र ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ शकते या भीतीने काही अनेक उमेदवारांचे कार्यकर्ते स्ट्राँग रूमच्या (EVM Strong Room) बाहेर पहारा देताना पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तशीच एक बातमी आहे. जिल्ह्यातील खुलताबाद नगरपालिकेसाठी (Khultabad Municipal Council) झालेल्या मतदानानंतर भाजप वगळता इतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमला रात्रीचा जागता पहारा देण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते रात्रभर स्ट्राँग रूमला भेटी देताना दिसत आहेत.
या जागत्या पहाऱ्यामागे एक घटना कारणीभूत आहे. दोन दिवसांपूर्वी स्ट्राँग रूम भोवती असलेल्या पोलिसांची इतर ठिकाणावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर बदली झालेले पोलीस त्यांच्या साहित्याच्या पेट्या घेऊन बाहेर पडले. त्यावेळी बाहेरच्या लोकांना भलताच संशय आला.
Chh. Sambhaji Nagar Election : भाजप वगळता सगळ्याच पक्षांचा पहारा
काही लोकांना असं वाटलं की पोलीस ईव्हीएम मशीन बाहेर घेऊन जात आहेत. त्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर मोठा जमाव जमला आणि त्यांच्याकडून पोलिसांच्या बॅग तपासण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांच्या बॅगमध्ये काहीही आक्षेपार्ह सापडले नाही आणि त्यानंतर कुठे जमाव शांत झाला.
या घटनेनंतर मात्र भाजप वगळता सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला. त्यामुळे निवडणुकीला उभा राहिलेले वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते रोज रात्रभर ईव्हीएम स्ट्राँग रूम भोवती चकरा मारत असतात.
Maharashtra Election : अनेक ठिकाणी स्ट्राँग रुमबाहेर पहारा
जालन्याच्या भोकरदनमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद केल्यानंतर या ईव्हीएम मशीन आता स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. नगरपालिकेच्या मंगल कार्यालयामध्ये स्ट्राँग रूम भोवती पोलिसांचे दुहेरी कवच लावण्यात आलं आहे. स्ट्राँग रुमच्या आतमध्ये एसआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणी खाली असणार आहे. तर जळगावच्या धरणगावमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते स्वतःच स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा देताना दिसत आहेत. हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात राज्यभर दिसत आहे.
ही बातमी वाचा :