मुंबई : विधानसभेला महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांना भाजप रेड कार्पेट अंथरतंय, शिवसेनेच्या नेत्यांना प्रवेश देत आहे अशी तक्रार करत नाराज झालेल्या शिंदेच्या शिवसेनेला आता नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याने आव्हान दिलं. आमच्यामागे ताकद उभी करा, छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एकही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही असं राजू शिंदे (Raju Shinde) म्हणाले. राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. राजू शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे कट्टर विरोधक आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मोठ्या प्रमाणात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग, आऊट गोईंग सुरू झाल्याचं दिसंतय. भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत, छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदेंचा पुन्हा भाजप प्रवेश करून घेतला. राजू शिंदेंनी 2024 ची विधानसभा निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाटांविरोधात लढवली होती. त्यामध्ये राजू शिंदे यांचा पराभव झाला होता.
Raju Shinde Joins BJP : एकही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही
घरवापसी केल्यानंतर राजू शिंदेंनी थेट शिंदेंचे विश्वासू नेते, संजय शिरसाटांना आव्हान दिलं. त्यांनी शिरसाटांचं नाव घेणं टाळलं असलं, तरी आपल्याच जीवावर जे मोठे झाले होते, त्यांनाच धडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो अशी टीका केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे एकहाती वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा राजू शिंदे यांनी केली. आपल्यामागे ताकद उभी करा, संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही असं म्हणत त्यांनी थेट आव्हानच दिलं.
Chhatrapati Sambhajinagar Politics : काय म्हणाले राजू शिंदे?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते म्हणाले की, "मी घरवापसी करतोय, त्यासाठी आभार आपले मानतो. मधल्या काळात काही तांत्रिक अडचण होती म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलो होतो. भाजपवर नाराजी नव्हती, मात्र आपल्या जीवावर जे मोठे झाले आहेत, त्यांनाच धडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकहाती वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही. अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप केल्याशिवाय राहणार नाही. यापुढे मी कधीही सोडणार नाही. आमचा देव तोच होता, आता पण आता बदलणार नाही."
आम्ही काम करतो, तुमचं समाधान होईल तेव्हा जबाबदारी द्या, तोपर्यंत देऊ नका असं आपण अतुल सावेंना सांगितल्याचं राजू शिंदे यांनी म्हटलं.
Raju Shinde Vs Sanjay Shirsat : शिंदेंच्या नेत्यांसमोर अडचणी वाढल्या
एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देऊ नये आणि हे पथ्य दोघांनीही पाळावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे व्यक्त करत होते. तर तेव्हाच दुसरीकडे नाशिक आणि संभाजीनगरमधून ठाकरे सेनेच्या दोन नेत्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण प्रवेश देत होते. संभाजीनगरचे राजू शिंदे आणि नाशिकचे अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या दोघांच्या प्रवेशामुळे चेक बसणार आहे तो शिंदेंच्याच नेत्यांना. कारण अद्वय हिरेंनी दादा भुसेंविरोधात तर राजू शिंदेंनी संजय शिरसाट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. शिवाय कमळ हाती घेताच राजू शिंदे यांनी दोन्ही शिवसेना संभाजीनगरातून संपवण्याची भाषा करत ताज्या-ताज्या मित्रपक्षालाच आव्हान दिलं.
ही बातमी वाचा: