Marathwada Water Issue Protest : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याच्या (Marathwada) हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली आहे. तर, पोलिसांनी माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह 50 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून जालना रोडवर हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा लक्षात घेत पोलिसांनी हस्तक्षेप करत यापूर्वी माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता साडेचार तासांनी पोलिसांनी राजेश टोपे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 50 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. 


मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात जनआंदोलनाची हाक देण्यात आली होती. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या शासनाच्या विरोधात मराठवाड्यातील मंत्री, सर्व पक्षीय आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी तसेच औद्योगिक संस्थां, पाणी वापर सहकारी संस्थांकडून आज आंदोलन केले जाणार होते. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर या आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरच रास्ता रोको सुरु केले.  या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी मंत्री अनिल पटेल, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे हजर होते. दरम्यान, पोलिसांनी टप्या-टप्प्याने आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.


पोलीस ठाण्यातच ठिय्या, घोषणाबाजी


रस्तारोको केल्यामुळे दुपारी साडेचार वाजता जिन्सी पोलिसांनी जवळपास दिडशे आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना विविध वाहनातून जिन्सी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. परंतु, आंदोलकांना ठेवण्यासाठी जागा अपुरी असल्यामुळे सर्वांना एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात हलविण्यात आले. तेथे पोलीस ठाण्याच्या समोर सर्वच आंदोलकांना बसविण्यात आले. नेते आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांच्या घोषणाबाजीने पोलीस ठाणे परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, पाणी सोडण्याचा निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याचं राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 


जायकवाडीच्या पाण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका 


अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून आता वातावरण अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पाण्यासाठी रस्त्यावरील लढाई सोबतच आता न्यायालयीन लढाई देखील पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला विरोध करत समन्यायी पाणी वाटपाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेच्या सुनावणीत मराठवाड्याची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यावर उद्या  (21नोव्हेंबर) रोजी सुनावणी होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


पाणी प्रश्न पेटणार! मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून आज रास्ता रोको