छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या (Marathwada) हक्काचे पाणी अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांतील धरणातून सोडण्याच्या मागणीसाठी आज मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन रस्त्यावर उतरणार आहे. वरील, धरणातून जायकवाडीत 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असतांनाही अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील पुढाऱ्यांनी हे पाणी रोखून धरले आहे. त्यामुळे, हे पाणी तातडीने सोडावे, या मागणीसाठी आज (20 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता गोदावरी महामंडळासमोर (सिंचन भवन) सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार आहे. 


मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात जनआंदोलन केले जाणर आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या शासनाच्या विरोधात मराठवाड्यातील मंत्री, सर्व पक्षीय आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी तसेच औद्योगिक संस्थां, पाणी वापर सहकारी संस्थांकडून आज आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, संजय शिरसाट, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक आमदार सहभागी होणार आहेत. आज सकाळी 11 वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.


मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आक्रमक...


समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणांतून मराठवाड्याला म्हणजेच जायकवाडी धरणात 8.6 टी.एम.सी. पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी 30 ऑक्टोबर रोजी घेतला. मात्र, निर्णय घेऊन 20 दिवस उलटले असतांनाही अजूनही पाणी सोडण्यात आले नाही. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील पुढाऱ्यांच्या दबावामुळे पाणी सोडण्याचा निर्णय होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता मराठवाड्याच्या ह्क्क्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन पाणी सोडण्याची मागणी करणार आहे. 


मराठवाड्यात परिस्थिती भयंकर... 


मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे, विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरी आणि बोरवेलचे पाणी आटले आहे. सोबतच अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. विशेष म्हणजे, हिवाळ्यात अशी परिस्थिती असल्याने आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी होत आहे. मात्र, असं असताना नेहमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावामुळे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी सोडले जात नसल्याचे आरोप होत आहे.


पत्रकार परिषदेतून दिली आंदोलनाची माहिती...


आजच्या आंदोलनाबाबत छत्रपती संभाजीनगर येथे सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती दिली. ज्यात, माजी मंत्री अनिल पटेल, आ. डॉ.कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास भुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पांडुरंग तांगडे, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, प्रा.आर.एम.दमगिर आदींची उपस्थिती होती.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nashik News: जायकवाडी पाणी प्रश्नावर उच्च न्यायालयात सुनावणी, पाणी सोडण्यावरून दोन्हीकडील पक्ष आमनेसामने