Sambhaji Bhide in Aurangabad : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) उद्या (20 जुलै) रोजी औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असणार असून, गंगापूर येथे आयोजित कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्याला आणि कार्यक्रमाला आता विरोध होताना पाहायला मिळत आहे. गंगापूर येथे उद्या होणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नयेत, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आंबेडकर अनुयायी आणि शहरवासियांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात देखील भिडे यांना असाच विरोध करण्यात आला होता.
संभाजी भिडे उद्या गंगापूर येथे येणार आहेत. दरम्यान यावेळी शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. मात्र गंगापुर शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला हानीकारक असणारे वक्तव्य करण्याचा हेतू आहे. त्यामुळे शहारातील व तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे काम होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करत या कार्यक्रमाला परवानगी न देण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच हा कार्यक्रम झाल्यास सभा आणि संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
काय म्हटले आहे निवेदनात?
दरम्यान गंगापूर पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "भिमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांची काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक गंगापूर शहारामध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. यापूर्वी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रविरोधी वक्तव्य केल्यामुळे जनमानसात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे आणि तसेच त्यांनी अनेक वेळा जातीय व धार्मिक तेढ निर्माण होईल असे अनेक वेळा वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे गंगापूर शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला हाणीकारक असणारे वक्तव्य करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे शहारातील व तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे काम होण्याची दाट शक्यता आहे. अशा देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. नाहीतर सर्व आंबेडकर अनुयायींच्या वतीने व शहरवासीयाच्या वतीने त्याचा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कार्यक्रमाची परवानगी देण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.
होर्डिंग काढण्यात आले...
दरम्यान संभाजी भिडे यांचा उद्या गंगापूर शहरात कार्यक्रम होणार असल्याने, शहरातील अनेक भागात होर्डिंग लावण्यात आले होते. भिडे यांचे स्वागत करणारे हे होर्डिंग शहरातील मुख्य चौकात देखील लावण्यात आले होते. मात्र विनापरवानगी हे होर्डिंग लावण्यात आल्याने स्थानिक प्रशासनाने ते काढून घेतले आहे. त्यामुळे भिडे यांचा औरंगाबाद दौरा चर्चेत आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या नांदेड दौऱ्याला विरोध, सभा उधळून लावण्याचा इशारा