संभाजीनगर : शहरातील वाळूज परिसरा झालेल्या एन्काऊंटरची राज्यभर चर्चा असून हा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप देखील होत आहे. याप्रकरणी, सीआयडीकडून तपास सुरू असून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील काल पोलीस (Police) आयुक्तालयात भेट देऊन पोलिसांना माहिती दिली, तसेच त्यांच्याकडून माहिती देखील घेतली. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात पोलिसांनी 26 मे च्या मध्यरात्री उद्योगपतीच्या घरावर दरोडा घालण्याच्या प्रकरणात एका संशयित आरोपीचा एन्काऊंटर केला. त्यानंतर, दरोड्यातील संशयित आरोपी अमोल खोतकरची बहिण आणि वडिलांनी पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. कारण, याप्रकरणी मोठं सोनं गायब झाल्याची चर्चा आहे. त्यातच, संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी हे सोनं 5 किलो नसून 10 किलो असल्याचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यामध्ये पोलीसदेखील सहभागी असतात असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यानंतर संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा केली. वाळूजच्या उद्योगपतीच्या दरोड्या त्या साडेपाच किलो सोन्यापैकी 32 तोळे रिकव्हर झाले, बाकी सोने कुठे गेले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र, ते सोनं साडेपाच किलो नसून 10 ते साडेदहा किलो सोनं चोरील्याचं पाकलमंत्री शिरसाट यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज हे वक्तव्य केल्याने या सोन्यासंदर्भात अनेक शंका व प्रश्न उपस्थित होत आहे. 

लड्डा यांच्या फिर्यादीनुसार साडे पाच किलो सोनं

दरम्यान, उद्योजक लड्डा यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी चोरीला गेली. मात्र, पालमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे, लड्ड्यांच्या घरून चोरीला गेलेल्या सोनं नेमकं किती? असा प्रश्न उपस्थित होतोय. 15 मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेला दरोडा आणि त्याचा सूत्रधार अमोल खोतकर याचे एनकाउंटर सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांकडून अद्यापही याविषयी गुप्तता पाळली जात असताना, दरोड्यात लुटलेल्या मुद्देमालाविषयी पालकमंत्र्यांच्या धक्कादायक वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी शिरसाट यांनी माध्यमांशी विविध विषयांवर चर्चा करत असताना दरोड्याबाबत वक्तव्य केले की, लड्डा यांच्या घरातून केवळ रेकॉर्डवरील सोन्याचे दागिने समोर आले. मात्र, नोंदवल्यापेक्षा अधिक सोने चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केला. तर, आज ते सोनं 10 ते साडे दहा किलो असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

30 वर्षांत कष्टाने कमावलेलं सोनं गमावलं

''दरोड्याविषयी उद्योजक संतोष लड्डा यांनी पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी गमावलेल्या सोन्याविषयी मात्र दुःख व्यक्त केले. मी 30 वर्षांत कष्टाने कमावलेले सोने गमावले. माझ्या पत्नीला दागिन्यांची आवड आहे. तपास काय सुरू आहे हे माहिती नाही. पण, पोलिस प्रामाणिकपणे तपास करत आहेत. त्यामुळेच आरोपी पकडले गेले. जे सोने गेले ते सर्व कागदोपत्री आहे. माझ्या जवळच्या एकाही व्यक्तीवर संशय नाही," असेही लड्डा यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा

माणूसकीला काळीमा; महिलेला 2 महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवलं; राजारामपुरी पोलिस स्टेशनच्या 100 मीटर अंतरावरील घटना