छत्रपती संभाजीनगर : वेगवेगळ्या मागण्यासाठी विरोधक सरकारच्या विरोधात नेहमी आंदोलन करत असल्याचे आपण नेहमी पाहतो. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चित्र उलटं आहे. कारण, या ठिकाणी चक्क एका मंत्र्याच्या मुलानेच आपल्या वडिलांच्या सरकार विरोधात मोर्चा काढला आहे. सिल्लोड तालुक्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसून, दुष्काळ (Drought) जाहीर करण्याची मागणी करत अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांचे पुत्र तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सरकार विरोधात मोर्चा काढला आहे. सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्च्याला सुरवात झाली आहे. 


मागील काही दिवसांपासून सरकार नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांनी चर्चेत आहेत. आता एका मोर्च्यामुळे सरकार आणि सरकारमधील एक मंत्री चांगलेच चर्चेत आले आहे. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंत्री सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी धडक मोर्चा काढला आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली  या मोर्च्याची सुरवात झाली. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून निघालेला हा मोर्चा तहसिल कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. 


सत्तेत असूनही मोर्चा काढण्याची वेळ... 


राज्यात शिवसेची (शिंदे गट) सत्ता असून, पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. प्रचंड विरोधानंतर देखील शिंदे यांनी सत्तार यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, आता त्याच अब्दुल सत्तार यांच्या मुलावर सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. सिल्लोड तालुक्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने, अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतांना सरकारने दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून सिल्लोड तालुका वगळला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. तर, शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी थेट आपल्याच सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे. 


ठिकठिकाणी बैठका... 


सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्च्याची मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी केली जात होती. अब्दुल समीर यांनी सिल्लोड तालुक्यातील महसूल मंडळ आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच तहसील कार्यालयावर निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले होते. त्यामुळे आजच्या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhajinagar : मोठी बातमी! मंत्र्यांचा मुलगाच काढणार सरकार विरोधात मोर्चा; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी