छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करतांना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी यापूर्वी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, आता त्यांनी यासाठी मराठा समाजाला आणखी एक नवीन आवाहन केले आहे. दिवाळीचं फराळ खाण्यासाठी राजकीय नेत्यांकडे जाणार असाल तर, आधी त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारा, त्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्याचं सांगा असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "राजकीय नेते दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे या कार्यक्रमांना मराठा समाजातील लोकं जात असतील, तर त्यांनी या नेत्यांकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा. तुम्ही मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा असे सर्वात आधी या नेत्यांना सांगा, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. तसेच, येणाऱ्या अधिवेशनात प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही या नेत्यांना सांगण्याचे जरांगे म्हणाले. 


अजित पवारांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया...


अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट नेमकी कशासाठी घेतली याबाबत अधिकृत माहित आमच्याकडे नाही. ही भेट मराठा आरक्षणासाठी होती की, त्यांच्या वैयक्तिक कामासाठी होती हा त्यांचा विषय आहे. मराठा आरक्षणासाठी भेट घेतली असेल तर चांगलंच आहे. तसेच, महाराष्ट्रमधील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची चर्चा झाली असावी अशी अपेक्षा करू, असे जरांगे म्हणाले. मात्र, त्यांची वैयक्तिक भेट असेल तर त्यात आम्हाला पडायचं नाही, असेही जरांगे म्हणाले. 


राजघराणेंकडील नोंदी तपासावीत...


दरम्यान, याचवेळी कुणबी नोंदीबाबत देखील जरांगे यांनी मोठी मागणी केली आहे. "राज्यातील राज घराण्यांकडे असलेली जुनी कागदपत्रे तपासण्यात यावीत, जेणेकरून आणखी नोंदी सापडतील. त्यामुळे,  राज्यातील राज घराण्यांना आवाहन करतो की, आपल्याकडील जुनी कागदपत्रे समितीला अथवा अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. 


उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता... 


दुसऱ्या टप्प्यात उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला मुदत दिली आहे. तेव्हापासून जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, आता आपली तब्येत ठणठणीत असून, 12 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या आपल्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


शिष्टमंडळ काही येईना, जरांगेंची भेट काही होईना; टाईम बॉन्डवरून सरकारकडून तारीख पे तारीख