छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यात (Marathwada) जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यावेळी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट (Lightning) देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोन दिवसांत वीज कोसळण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहायला मिळाले. ज्यात मागील दोन दिवसांत मराठवाड्यातील बीड, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यात वीज कोसळून एकूण 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. सोबतच काहीजण जखमी देखील झाले आहेत. तसेच वीज पडून अनेक जनावरांचं देखील मृत्यू झाला आहे. 


बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवाड फाट्याजवळील सोनिमोहा शिवारात शुक्रवारी वीज पडून संगीता मच्छिंद्र कराड (वय 48) ही शेतमजूर महिला ठार झाली. परभणी तालुक्यातील गंगाखेडच्या सविता विठ्ठल कतारे (वय 40 वर्षे), निकिता विठ्ठल कतारे (वय 18 वर्षे) असे मयत मायलेकीचे नावं आहेत. दुसऱ्या घटनेत परभणीच्याच घटनेत भेंडेवाडी येथे दुपारी चारच्या सुमारास वीज पडल्याने ओंकार किशन घुगे (वय 14 वर्षे) हा सुद्धा मरण पावला. तसेच, नांदेडच्या किनवट तालुक्यातील साईनाथ दत्ता घुगे (वय 26 वर्षे) याचा देखील वीज पडून मृत्यू झाला आहे. 


मायलेकीचा वीज पडून मृत्यू...


परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा व भेंडेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी तीन ते चार वाजेदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून मायलेकीसह तिघांचा मृत्य झाला. तसेच तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस आल्याने डोंगर पिंपळा शिवारात शेतातील आखाड्यावर सविता विठ्ठल कतारे व त्यांची मुलगी निकिता विठ्ठल कतारे या आश्रयास गेल्या. त्याचवेळी शेतातील आखाड्यावर वीज कोसळून मायलेकीचा मृत्यू झाला. तसेच, दुसरी घटना याच तालुक्यातील भेंडेवाडी येथे घडली. भेंडेवाडी शिवारातील शेतात पावसामुळे कडब्याच्या गंजीच्या बाजूला आडोसा घेवून ताडपत्री पांघरून बसलेल्या चौघांवर वीज कोसळली. यामध्ये ओमकार रामकिसन घुगे (वय 14 वर्षे) या मुलाचा गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर, सुनीता काशिनाथ शेफ (वय 45 वर्षे), रेणुका काशीनाथ शेफ (वय 27 वर्षे) आणि गोविंद विनायक घुगे (वय 25 वर्षे, सर्व रा. भेंडेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. 


विजेच्या तडाख्याने सहा जनावरांचा मृत्यू...


विजेच्या गडगडाटासह शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस झाला. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातील सहा जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा तहसीलदारांनी केला आहे. या पावसादरम्यान फुलंब्री तालुक्याच्या पाथ्रीमधील आबाराव पाथ्रीकर यांच्या गोठ्यावर अचानक विज कोसळली. यात गोठ्यातील दोन गायींचा मृत्यू झाला. तर कन्नड तालुक्याच्या पळशीतील प्रवीण जाधव यांच्या बैलाचा शेतात वीज कोसळल्याने मृत्यू झाला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Weather Update: पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, कोल्हापूर, कोकणला ऑरेंज अलर्ट