Marathwada Accident News : राज्यात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून मराठवाड्यात (Marathwada) गेल्या 24 तासांत पाच अपघातांमध्ये 9 जण ठार, तर 23 जखमी झाले आहेत. बीड, हिंगोली, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत झालेल्या या पाच अपघातांमुळे मराठवाडा हादरला आहे. तर यातील एक अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे. यातील सर्व जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. यात काहींची प्रकृती गंभीर आहे. 


पहिला अपघात : बीड जिल्ह्यात सोमवारी दोन अपघात झाले. शिरूर कासार तालुक्यातील जाटनांदूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात जाणाऱ्या दोन प्राध्यापकांचा अपघातात मृत्यू झाला. शहादेव शिवाजी डोंगर (वय 44) व अंकुश साहेबराव गव्हाणे असे या दोन्ही शिक्षकांचे नावं आहेत. नगर रोडवर मुर्शदपूर फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला एका क्रेटा कारने जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की दुचाकीने पेट घेतला. अपघातात जखमी प्राध्यापक आगीत होरपळले. यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचा अक्षरश: कोळसा झाला होता. 


दुसरा अपघात : बीड तालुक्यातील उदंडवडगाव येथे दुसऱ्या अपघाताची घटना घडली आहे. भाविकांच्या पिकअप जीपला एसटी बसने धडक दिल्यामुळे दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला असून, 23 जण जखमी झाले आहेत. परभणी येथील भाविक पिकअप जीपमधून मांढरादेवीकडे जात होते. दरम्यान रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अंबड आगाराच्या जालना- पंढरपूर या बसने (एम. एच. 06 एस. 8545) पिकअपला पाठीमागून धडकी दिली. यात मथुराबाई पांडुरंग गवाले (वय 70 वर्षे, आंबेडकरनगर, परभणी) व रंगूबाई साहेबराव जाधव (वय 55 वर्षे, पंचशीलनगर, परभणी) यांचा मृत्यू झाला. तसेच इतर 23 जण जखमी झाले असून, यात 11 लहान मुलांचा समावेश आहे. 


तिसरा अपघात : हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा ते डोंगरकडा मार्गावर गीतांजली हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन विद्यार्थी ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. तोंडापूर येथील कृषी महाविद्यालयात बीएस्सी (कृषी) तृतीय वर्षात शिक्षण घेणारे विष्णू बालाजी पाटील (शिवणी बुद्रुक, जि. लातूर), मयूर केशवराव दुबे (शुक्रवारपेठ, वाशीम) आणि त्यांचा मित्र पंढरी इंगोले हे तिघे रविवारी रात्री आठच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी दुचाकीवर वारंगाफाटा येथे जात होते. याचवेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता विष्णू पाटील व मयुर दुबे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.


चौथा अपघात : लातुरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन मोटारसायकलवरून गावाकडे परतत असताना टिप्परने जोराची धडक दिल्यामुळे सख्खे बहीण-भाऊ जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास आष्टा मोड येथे घडली. अवधूत शिवराज रक्ताटे (वय 18 वर्षे) आणि निकिता शिवराज रक्ताटे (वय 20 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. निकिता बी. कॉम. तर अवधूत बी. एस्स्सी प्रवेश पूर्ण करून आंबुलगाकडे परतत होते. तेव्हा टिप्परने (एमएच 20, ईआय 7204) त्यांना समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 


पाचवा अपघात : दरम्यान बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले होते. ज्यात एकाच मृत्यू झाला आहे. सुशीलकुमार दिलीप थोरात (वय 38 वर्षे रा. शिरपूर जैन सरकारी दूध डेअरी मागे मालेगाव जि. वाशिम) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर बबिता सुशीलकुमार थोरात (वय 35 वर्षे) व अर्पिता सुशीलकुमार थोरात (8 वर्षे) असे जखमींचे नावं आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, पती ठार आणि पत्नी-मुलगी जखमी; छत्रपती संभाजीनगरमधील घटना