छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 40 दिवसांचा वेळ दिला असून, 14 ऑक्टोबरला 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने सरकारला आरक्षणाची आठवण करून देण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेला राज्यभरातून मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. तर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhajinagar) देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव जालना येथील सभेला जाणार आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 700 वाहनांचा ताफा घेऊन या सभेला जाणार असल्याचा निर्णय मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. 


अंतरवाली सराटीमधील 14 ऑक्टोबरला होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाची महत्वाची बैठक शनिवारी झाली. यावेळी बोलताना विनोद पाटील म्हणाले की, 14 ऑक्टोबररोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मेळाव्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. त्यामुळे संभाजीनगर शहरातील कानाकोपऱ्यासह ग्रामीण भागातील समाजबांधवांशी संपर्क करण्यात आला आहे. त्यासाठी वेळोवेळी कॉर्नर बैठका घेतल्या असून, मोठ्या प्रमाणात समाज बांधव अंतरवाली सराटी येथे जाणार आहेत. त्यासाठी किमान सातशे वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी कुणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. याशिवाय काही समाज बांधव वैयक्तिक वाहनांनी अंतरवालीकडे येणार असून मराठा आरक्षणासाठी सर्वांनी सहकार्य करावे यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आले.


सभेला राज्यभरातून मराठा बांधव उपस्थित राहणार


मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणास्थळी जाऊन जरांगे यांचे उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच, एक महिन्याची वेळ देखील मागितला. तर, जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी 40 दिवसांची मुदत देत उपोषण मागे घेतले होते. दरम्यान जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचे 30 दिवस 14 ऑक्टोबरला होत आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने 14 ऑक्टोबरला अंतरवाली गावात भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यभरातून मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मागील दोन आठवड्यापासून या सभेची तयारी करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


तब्बल 70 फुट उंच पाण्याच्या टाकीवर उपोषण, आंदोलनाचा आजचा सहावा दिवस; मराठा आरक्षणाची मागणी