छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी येत आहे. मात्र, त्याच्या याच दौऱ्याला आता सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय प्रलंबित असून, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊ नयेत अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे. याबाबत गंगापूर तहसीलदार आणि पोलिसांना देखील निवेदन देण्यात आले आहे. 


मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस हे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर मतदारसंघात जलसिंचन पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी 11 जानेवारीला येणार आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्याला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत सरकारमधील मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊ नयेत असे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 


पोलिसांना निवेदन...


सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून सुरु असलेल्या योजनेला आमचा विरोध नाही. योजनेसाठी पैसा जनतेचा आहे. ही योजना ज्या शेतकऱ्यांसाठी होत आहे, त्याच शेतकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन करावे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतांना, सरकारमधील कुठल्याही मंत्र्याने येऊन विकास कामाच्या उ‌द्घाटनाच्या नावाखाली आमच्या तालुक्यातील सामाजिक वातावरण खराब करु नये. 11 जानेवारीला आरापूर शिवारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत आहे. या अगोदर अनेक वेळा प्रसार माध्यमे, सभा यामधून मराठा समाजाच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. गंगापूर तालुका शांत असून, तेथे येऊन भावना भडकवू नये. यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून विनंती करत आहोत. उपमुख्यमंत्री व सरकारमधील कुठल्याही मंत्र्याने आमच्या तालुक्यातील येऊ नये. नसता होणाऱ्या परीणामास आयोजक, प्रशासन, महाराष्ट्र सरकार जवाबदार असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. 


पोलिसांकडून सभास्थळाची पाहणी...


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंगापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, आरापूर येथे त्यांची सभा देखील होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून सभास्थळाची पाहणी करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सभास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोबतच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके इतर कर्मचारी देखील हजर होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! शिंदे समिती पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार; कुणबी नोंदी शोधणार