छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघणार आहे. दरम्यान, त्यांचा हा दौरा कसा असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहे. या दौऱ्यात कोणती वाहनं असणार, जेवणाची सोय कशी असणार, मुंबईत राहण्याची सोय कशी असणार, तसेच मनोज जरांगेंच्या सोबत कोण कोणती लोक मुंबईच्या दिशेने निघणार. या सर्व प्रश्नांची उत्तरं खुद्द मनोज जरांगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार आहे. आम्ही 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहोत. आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असून, दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेली आहे. आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर, ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे. सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे जे काही पारंपारिक खेळ आहे, असे खेळ आयोजित करण्यात येतील. आनंद उत्साहा करत आम्ही मुंबईकडे जाणार आहोत.
राहण्याची आणि खाण्याची अशी असणार व्यवस्था...
एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने जाणाऱ्या आंदोलकांची खाण्याची आणि राहण्याची कशी व्यवस्था असणार यावर देखील मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. "राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आम्ही घेऊन जात असलेल्या गाड्यात करणार आहोत. पाऊस आल्यास त्याच गाड्यात बसून स्वतःची सुरक्षा करणार आहोत. त्यामुळे, तुम्ही आम्हाला कसे अडवता पाहतो, असे जरांगे म्हणाले.
मुंबईकडे जातांना तीन तुकड्या केल्या जाणार...
दरम्यान पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "मुंबईकडे जाण्यासाठी वाहनांची नोंदणी करायला सुरुवात झाली आहे. मुंबईकडे निघतांना तीन तुकड्या करण्यात येणार आहे. ज्यातील एका तुकडीत पिण्याच्या पाण्याची, डॉक्टर, जेवणाची सोय असणार आहे. सोबतच ढोल, हलक्या असे पारंपरिक गोष्टी देखील घेऊन आम्ही जाणार आहोत. आमच्यासोबत अंदाजे 10 लाख वाहनं असण्याची शक्यता आहे. सोबत ज्वारी, बाजरीचे पीठ असणार आहे. तसेच, साबण, तेल आणि कोलगेट आशा गरजेच्या सर्व वस्तू सोबत घेऊन निघणार आहोत. पाऊस असल्यास ताडपत्री सोबत असणार, असल्याचे जरांगे म्हणाले.
मुंबई दौऱ्याचा खर्च कोण करणार...
या संपूर्ण मुंबई दौऱ्याचा खर्च आम्ही स्वतः करणार आहे. आम्ही शेतकरी असून कष्ट करतो. सर्व गावं मिळून खाण्याच्या गोष्टी जमा करून देणार आहे. गाड्याला लागणाऱ्या डिझेलचा खर्च देखील गावकरी एकत्र मिळून करणार आहेत. काही लोकं मुंबईत आणि काही गावात खिंड लढवणार आहे. आम्हाला मुंबईत जाण्याची हौस नाही. पण आम्हाला आरक्षण देणार नसाल तर आम्हाला जावेच लागणार. शेवटची विनंती आहे सर्व नेत्यांना, हीच वेळ आहे मराठा समाजाला न्याय देण्याची. अन्यथा मराठा समाज तुम्हाला दारात उभं करणार नाही, असे जरांगे म्हणाले.
पोलिसांनी नोटीस दिल्याने मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढतेय...
मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काही ट्रॅक्टर चालकांना नोटीसा देण्यात आले आहे. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, "पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्याने मुंबईकडे येणाऱ्या लोकांची आणखी संख्या वाढत आहेत. आमचा संबंध नसतांना आम्हाला नोटीस दिली जात आहे म्हणत न येणारी लोकं देखील मुंबईला येण्यासाठी तयारी करतायत, असे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: