छत्रपती संभाजीनगर : निवडणूक लागण्याअगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, नाही तर फडणवीस यांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. फडणवीस यांना मी हिताचे सांगतोय, मराठ्यांना डावलू नका, असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील मराठ्यांची इच्छा होती की, दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. माझी अजूनही तब्येत बरी नाही. परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला तुफान पोरं येणार आहेत. कधी दसरा येतो अशी आशा लागली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या
ते पुढे म्हणाले की, कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा घेत आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या. दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणाला जाऊ नका, अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची नावे सांगा. सर्व नेत्यांना सांगतो की आडवे पडू नका, गप्प राहा. कुठे इकडे, तिकडे मेळावे असतील तर तिकडे जाऊ नका. नारायणगडावर होणारा दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही, या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
...तर फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल
दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या. त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. दसरा मेळावा घ्यायची खूप दिवसाची इच्छा होती. आम्हाला पाडायचे नाही आणि उभेही करायचे नाही, पण बैठक होणार आहे. फडवणीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला लोकं येणार आहेत. भाजपमधील मराठ्यांनी पण हाच विचार करा आणि फडणवीसांना सांगा. निवडणूक लागण्याअगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, नाही तर फडणवीस यांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल, असा इशारा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय.
मराठ्यांना डावलू नका
मी लोकसभेच्या अगोदर सांगितले की, सरकार निवडणूक घेणार नाही. मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. नाही तर माझा नाईलाज आहे, तुम्ही तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजावून सांगा. फडणवीस तुम्ही निवडणूक लागण्याआधी आमच्या मागण्या मान्य करा. तुमचे लोक आमच्याकडे येतात. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही. तुम्हाला शब्द आहे, मागण्या मान्य केल्या नाही तर तुमचा सुपडा साफ होईल. फडणवीस यांना मी हिताचे सांगतोय, मराठ्यांना डावलू नका. जनता, मुस्लीम बांधव, बारा बलुतेदार म्हणतात की मी मुख्यमंत्री व्हावे. पण, मी स्वार्थी नाही, मला समाज मोठा आहे. वेळ, मुहूर्त योग्य वेळी घडून येते आणि त्याचा फायदा मराठा, मुसलमान, बारा बलुतेदार यांनी घेतला पाहिजे. दसरा मेळाव्याला ऊन वारा पाऊस असला तरी देखील कार्यक्रमाला या, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
आणखी वाचा
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''