Chhatrapati Sambhajinagar: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे.  छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये केलेल्या आंदोलनानंतर पालकमंत्री सत्तार चांगलेच भडकले आहेत. भाजपने आम्हाला विरोध केल्यास आमचे शिवसैनिक देखील पूर्णपणे हिशोब घेतील असे इशाराच पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी भाजप नेत्यांना दिलाय. विशेष म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानंतर सत्तारांनी भाजपने त्यांना हा इशारा दिलाय. या वादामुळे  महायुतीतच नवा वाद ओढवल्याची चर्चा आहे.


अब्दुल सत्तारांचा भाजप नेत्यांना इशारा 


शिवसेना शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपने आम्हाला विरोध केल्यास आमचे शिवसैनिक देखील पूर्णपणे हिशोब घेतील असा थेट इशाराच भाजप नेत्यांना दिला आहे. भाजपचे लोक सिल्लोड मध्ये ज्या पद्धतीने काम करतील त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रभर काम करू असं सत्तार म्हणालेत. सिल्लोड मधील भाजप नेत्यांच्या विरोधानंतर सत्तार यांनी हा इशारा दिलाय. 


सत्तार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने 


पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सोमवारी छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये भाजपसह इतर काही संघटनांनी निदर्शने केली. सत्तार यांच्या समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेधार्थ हे मोर्चे काढण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीका केली होती.


सिल्लोडचा पाकिस्तान झालाय 


सत्तारांचा मतदारसंघ असलेला सिल्लोड हा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर (Abdul Sattar) हल्लाबोल केला. माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात दानवेंनी सत्तारांविरोधातील खदखद बोलून दाखवली होती. सिल्लोडचे आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये (Raosaheb Danve) नवा वाद तसा जुनाच आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी  झाडल्या जातात. आणि याचं कारण ठरलं होतं दानवेंचा जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला पराभव. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. पण सत्तार यांनी दानवेंचा प्रचार न करता काँग्रेसचा उमेदवार निवडून आणल्याचा आरोप होत आहे. यावरूनच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी सत्तार यांच्यावर हल्लाबोल करताना सिल्लोडचा पाकिस्तान होत असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना अब्दुल सत्तारांनीही पलटवार करत सिल्लोडला बदनाम करणं योग्य नाही, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यचा परिणाम भाजपला भोगावे लागतील असा थेट इशाराच सत्तारांनी दिला होता.