Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) मोठा दिलासा दिला आहे. जरांगे यांच्या बीडमध्ये (Beed) होणाऱ्या आजच्या बैठकीला परवानगी देण्याचे आदेश खंडपीठाने बीड पोलिसांना (Beed Police)  दिले आहे. मनोज जरांगे यांची आज संध्याकाळी बीडच्या परळीत बैठक होत आहे. मात्र, बीड पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) आचारसंहितेचे कारण देत परवानगी नाकारली होती. त्यामुळे आयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. 


आज संध्याकाळी 6 वाजता मराठा समाजाने परळीत बैठकीचे आयोजन केले होते. मनोज जरांगे हे देखील या बैठकीला हजर राहणार आहे. मात्र, बीड जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने काढलेल्या आदेशानुसार जातीय सभा संमेलनावर,  बैठकांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या आदेशानुसार पोलिसांनी परवानगी नाकारली होती. याविरोधात बैठकीच्या आयोजकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर आजच सुनावणी झाली असून, न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यासह आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती...


बीडच्या परळी वैजिनाथ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या बैठकीच्या अनुषंगाने आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून, जात, धर्म, भाषेवर एकत्र येऊ नयेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले असल्याचे म्हणत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आयोजकांनी थेट न्यायालयात धाव घेतली आणि अखेर त्यांना बैठकीला परवानगी मिळाली आहे. 


बैठकीवर पोलिसांची नजर राहणार? 


पोलिसांनी जरांगे यांच्या परळीमध्ये होणाऱ्या बैठकीची परवानगी नाकारल्यानंतर थेट न्यायालयानेच बैठकीला परवानगी दिली आहे. मात्र, परवानगी देतांना न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या बैठकीत अटी शर्तींचे उलंघन होणार नाही यासाठी स्वतः पोलीस बैठकीवर लक्ष ठेवून असण्याची शक्यता आहे.  


जरांगे काय बोलणार? 


न्यायालयाच्या आदेशानुसार मनोज जरांगे यांच्या परळीमधील सभेला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आजची बैठक महत्वाची ठरणार आहे. तसेच, याच बैठकीत मनोज जरांगे नेमकं काय बोलतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वी जरांगे यांनी प्रत्येक सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या बैठकीत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


संबंधित बातम्या : 


मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली; मराठा आंदोलकांची न्यायालयात धाव