Chhatrapati Sambhaji Nagar : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे येत्या 10 फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद संभाजीनगर या संमेलनात गुणी साहित्यिक, कवी, कलावंत अशा शिक्षकांचा सहभाग असणार आहे. शिक्षकांच्या साहित्य प्रतिभेला आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा, तसेच, शिक्षकांना व्यासपीठ मिळावे असा या साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. या संमेलनाचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे उपस्थित राहणार आहेत.


कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद विविध कार्यक्रमांचं आयोजन 


विद्यार्थ्यांच्या भाषा, कला विकासात तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचं योगदान फार मोलाचं आहे. याच शिक्षकांच्या साहित्य प्रतिभेला वाव मिळावा असा या संमेलनाचा हेतू आहे. या शिक्षक साहित्य संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद आणि चित्रप्रदर्शन यांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षकांनी शिक्षकांसाठीच भव्य स्वरूपात भरवले जात असलेले हे जिल्ह्यातील पहिलेच शिक्षक साहित्य संमेलन ठरणार असून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या आणि प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकांचा यात सहभाग असणार आहे. या संमेलनात साधारण 400 हून अधिक शिक्षक सहभागी होणार आहेत.


400 हून अधिक शिक्षकांचा सहभाग 


10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हे संमेलन अग्रसेन विद्यामंदिर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या संमेलनाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबरच प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे उपस्थित राहणार आहेत. हे शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ आणि रमेश ठाकूर यांनी दिली. 


ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या हस्ते 40 हून अधिक शिक्षक कलावंतांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत आणि रवींद्र मार्डिया यांची प्रमुख उपस्थिती असेल. याच कार्यक्रमात 138 हून अधिक शिक्षक कवींच्या कवितांचा समावेश असलेला 'काव्यदिंडी' हा संपादित कवितासंग्रह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला जाणार आहे. त्यानंतर भव्य कविसंमेलन ज्येष्ठ कवी प्रा. श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून यात 56 हून अधिक शिक्षक कवी सहभागी होणार आहेत. 


'असं' असेल संमेलनाचं स्वरूप 


पहिल्या सत्रात संमेलनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होईल. तर, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची उपस्थिती असेल. संमेलनाध्यक्ष डॉ. हबीब भंडारे यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. याच कार्यक्रमात 138 हून अधिक शिक्षक कवींच्या कवितांचा समावेश असलेला 'काव्यदिंडी' हा संपादित कवितासंग्रह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला जाणार आहे. 


दुसऱ्या सत्रात 'शिक्षक साहित्याचा विद्यार्थी अध्ययनावर प्रभाव' या विषयावर डॉ. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यात मेघना गोरे, अनिल देशमुख, संजय कुलकर्णी, शेख शब्बीर, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. विनोद सिनकर हे शिक्षक साहित्यिक सहभागी होणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात नामदेव निकम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडेल, यात दीपक सोनवणे, खान जिनत फरहीन वजाहत अली, रुपाली बंडाळे, वैशाली साबदे, अश्विनी सोनवणे, कुमार बिरदवडे, किरण गाडेकर हे शिक्षक कथाकार सहभागी होणार आहेत. 


त्यानंतर भव्य कविसंमेलन ज्येष्ठ कवी प्रा. श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून यात 56 हून अधिक शिक्षक कवी सहभागी होणार आहेत. शेवटच्या सत्रात संमेलनाचा समारोप समारंभ प्रसिद्ध बालसाहित्यिक, अनुवादक डॉ. विशाल तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.


महत्त्वाच्या बातम्या : 


Pune NCP News : पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा; पक्ष कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त