Jayakwadi Dam Protest : जायकवाडी धरणावर प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात हजारोंच्या संख्येने मच्छीमार आज आपल्या कुटुंबासह पैठणच्या जायकवाडी धरणावर (Jayakwadi Dam) एकत्र आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दुपारी 12 वाजता आंदोलनाचा वेळ असतांना पहाटे पाच वाजताच हजारो आंदोलक धरणावर जाऊन धडकले असून, याबाबत प्रशासनाला देखील कोणतेही कल्पना नव्हती. जायकवाडी धरणावर होणारा सौर ऊर्जा प्रकल्पल रद्द करण्याची प्रमुख मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच आता पोलीस आंदोलनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांना धरणावरून निघून जाण्याची विनंती केली जात आहे. 


मराठवाड्याची तहान भागवणारा आणि सर्वात मोठा मातीचं धरण म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरणावरील 15 हजार एकरात तरंगता सौर प्रकल्पलं करण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे देखील बोलले जाते. मात्र, याच प्रकल्पाला कहार भोई आणि भिल्ल समाजाचा मोठा विरोध होत आहे. त्यामुळे आज (7 फेब्रुवारी) रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मच्छीमारांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. दुपारी 12 वाजता हे आंदोलन होणार होते. मात्र, आंदोलकांना पोलिसांकडून रोखले जाण्याची शक्यता लक्षात घेता आंदोलकांनी गनिमा कावा करत पहाटे 5 वाजताच जायकवाडी धरण गाठले. लहान मुलं, महिला, वृद्ध असे हजारोच्या संख्येने  मच्छीमार जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झाले आहेत. 


प्रशासनाची धावपळ....


आज जायकवाडी धरणावर मच्छीमार आंदोलन करणार असल्याची माहिती प्रशासनाकडे होती. मात्र, दुपारी 12 वाजता हे आंदोलन होणार असल्याने पोलिसांकडून त्यानुसार नियोजन करण्यात आले होते. पोलिसांचा विशेष बंदोबस्त देखील मागवण्यात आला होता. मात्र, पोलिसांना थोडेही खबर न लागू देता रात्रीच आंदोलकांनी नियोजन केले. तसेच पहाटे 5 वाजता जायकवाडी धरणावर दाखल होण्याच्या सूचना गुप्तपणे सर्व आंदोलकांपर्यंत पोहचवण्यात आले. त्यामुळे ठरल्यानुसार हजारो आंदोलक पहाटेच धरणावर दाखल झाले. मात्र, हजारो आंदोलक जायकवाडी धरणावर दाखल झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, आंदोलकांना धरणावरून खाली येण्याची विनंती केली जात आहे. सोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! जायकवाडीतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव; मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट