Chhatrapati Sambhajinagar News: दोन दिवसीय G-20 परिषदेसाठी (G 20 Conference) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात आलेल्या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधीनी आज सकाळी बिबी का मकबरा (Bibi Ka Maqbara) या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. यावेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बीबी का मकबरा आणि परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून G-20 परिषदेचं शिष्टमंडळ भारावून गेलं. यावेळी शिष्टमंडळाने सामूहिक फोटोशूट देखील केले. तर इंटयाक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तू विषयी माहिती दिली.
G-20 परिषदेच्या शिष्टमंडळाने आज (28 फेब्रुवारी) शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबी का मकबऱ्याला भेट दिली. शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या. शिष्टमंडळ औरंगाबाद लेणीला भेट देणार असल्या कारणाने संपूर्ण लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते. औरंगाबाद लेणी पहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळच असणाऱ्या बीबी का मकबऱ्याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी आणि सनई चौघड्याच्या वादनाने अतिशय उत्साहात करण्यात आले. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बीबी का मकबरा पाहताना पाहुण्यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले.
वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला!
मकबरा परिसरात संबंधित सर्व प्रतिनिधींचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला होता. सर्व परदेशी पाहुण्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला. 'आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष' असल्याने या मध्ये विशेष तृणधान्याचा समावेश होता. यात मूग, मटकी, ज्वारी या धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाने, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार शंकर लाड तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्राचीन वारसा पहिल्यानंतर केलं कौतुक!
तीन वातानुकूलित बसेसमधून सकाळीच लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नऊवारी नेसलेल्या तरुणींनी त्यांच्यावर फुलांची उधळण करुन त्यांना गुलाब पुष्प भेट दिले. लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेले होते. पुरातत्व विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य लेणीच्या परिसरात आल्यानंतर लेणीचे सौंदर्य पाहून सर्व महिला थक्क झाल्या. यावेळी उपस्थित गाईडने प्राचीन लेणीच्या प्रत्येक भागाची इत्यंभूत माहिती पाहुण्यांना दिली. हा प्राचीन वारसा पहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-20 बैठकीला सुरुवात; लैंगिक डिजिटल तफावतवर चर्चा