Chhatrapati Sambhajinagar: केंद्राने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यांच्या नामांतराच्या मागणीला परवानगी देताच राज्य सरकराने राजपत्र काढून दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून देखील आपापल्या कार्यालयाचे नावं बदलण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील औरंगाबाद महापालिकेचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे आता महापालिका मुख्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावला जाणार आहे.


केंद्र आणि राज्य सरकराने काढलेल्या आदेशानुसार औरंगाबाद शहराचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे अशी जुनी मागणी होती. त्यानुसार आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर लगेचच राज्यात सत्तांतर झाले आणि नवीन सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव घेऊन, तो केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला.


त्यानंतर आता केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर नावास मंजुरी दिली. त्यानंतर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने राजपत्रात तसा बदल प्रसिद्ध केला. राजपत्र प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनीदेखील औरंगाबाद महापालिकेचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर महापालिका करण्यात येत असल्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. या प्रस्ताव मंजुरीमुळे आता महापालिकेच्या मुख्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावला जाणार आहे. शिवाय सर्व कार्यवाहीत छत्रपती संभाजीनगर असेच नाव वापरले जाणार आहे.


सहीसाठी कर्मचारी रात्री 11 वाजता पोहचले आयुक्त बंगल्यावर


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा ठराव शासनाकडून 26 फेब्रुवारी रोजी राजपत्र प्रसिद्ध झाले. त्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने लगोलग ठरावाची कार्यवाही केली. सायंकाळी 7 वाजता नगर सचिव कार्यालयाचे कर्मचारी महापालिका मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर उपायुक्त अपर्णा थेटे यादेखील महापालिकेत पोहोचल्या. रात्री उशिरा ठराव तयार करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास आयुक्त बंगल्यावर जाऊन त्यावर सही घेतली.त्यामुळे आता लवकरच महापालिकेच्या मुख्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक दिसणार आहे. 


आता जिल्हा देखील छत्रपती संभाजीनगर 


राज्य सरकराने सुरवातीला औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याबाबत आदेश काढला होता. मात्र महसूल आणि वन विभागाची परवानगी मिळाली नसल्याने जिल्ह्याचे, विभाग आणि तालुका यांचे नाव औरंगाबाद कायम होते. दरम्यान 26 फेब्रुवारीला महसूल आणि वन विभागाने देखील राजपत्र काढून जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता विभाग, जिल्हा, तालुका देखील छत्रपती संभाजीनगर नावाने ओळखले जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


शहरानंतर आता संपूर्ण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखला जाणार