Chhatrapati Sambhajinagar: नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. मात्र याचवेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले.'जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला आहे. तर याच निर्णयाच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र याच साखळी उपोषणात काही तरुणांनी चक्क औरंगजेबाचे फोटो घेऊन जल्लोष साजरा केला. या सर्व घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, कोणीतरी आंदोलन खराब करण्यासाठी काही लोकांना फोटो देऊन पाठवलं, पण आम्ही त्यांना बाहेर काढलं आहे. 


नेमकं काय झालं? 


जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आजपासून नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी एमआयएमचे खासदार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान उपोषण सुरु होऊन काही तास उलटत नाही, तो उपोषणाला पाठींबा देणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळाली. तर यावेळी तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. याचवेळी या गर्दीत एक तरुण हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन उपोषणाच्या ठिकाणी आला. त्यानंतर तो उपोषणाच्या मुख्य ठिकाणी फोटो हातात उंचावत घेऊन गेला. फोटो पाहून इतर तरुणांनी 'जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद' आशा घोषणा द्यायला सुरवात केली. पाहता-पाहता याठिकाणी जल्लोष सुरु झाला. मात्र हा सर्व प्रकार आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला फोटोसह उपोषणास्थळून बाहेर काढून लावले. 






मनसेकडून आंदोलन! 


दरम्यान छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण करण्यात आले. तर यालाच प्रत्युत्तर म्हणून, मनसेने नामांतराच्या समर्थनार्थ आज स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी नामांतराला आमचे समर्थन असल्याचे यावेळी मनसेकडून सांगण्यात आले. तर यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.


इतर महत्वाच्या बातम्या: 


छत्रपती संभाजीनगरमध्ये 'औरंगाबाद'साठी उपोषणाला सुरुवात; खासदार जलील यांची उपस्थिती