Chhatrapati Sambhaji Nagar News : आधीच शेतकरी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसासह गारपीटच्या संकटाने अडचणीत आला आहे. दरम्यान असे असताना शेतकऱ्यांची शासकीय ठिकाणी होणारी अडवणूक काही थांबता थांबत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) फुलंब्री तालुक्यातील जातवा येथील शेतकरी दाम्पत्याने कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात पैसे देण्यास नकार दिल्याने सोसायटीच्या गटसचिवाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शिवीगाळ करणाऱ्या गटसचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू किसन वानखेडे असे शिवीगाळ करणाऱ्या गटसचिवाचे नाव आहे. 


या प्रकरणी पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फुलंब्री तालुक्यातील जातवा येथील साहेबराव बाजीराव पवार आणि त्यांच्या पत्नी अलकाबाई साहेबराव पवार हे बँकेच्या कामासाठी सोमवारी (10 एप्रिल) सिल्लोडच्या अंधारी येथील बँकेत गेले. यावेळी तिथे उपस्थित असलेला सोसायटीचा गटसचिव बाळू किसन वानखेडे हा पवार यांच्याकडे आला. तसेच तुमचे सोसायटीचे कर्ज मी मंजूर केले असून, त्याबदल्यात मला तीन हजार रुपये द्या असे म्हणाला. पण पवार यांनी पैसे नसल्याचे सांगत, पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या वानखेडे याने साहेबराव पवार यांच्या हातातून बँकेचे पासबुक हिसकावून घेतले आणि फाडून फेकले. 


अलकाबाईंना शिवीगाळ केली 


पैसे न दिल्याने गटसचिव बाळू किसन वानखेडे याने शेतकरी पवार यांचे खातेपुस्तक फाडले. त्यामुळे पवार यांच्या पत्नी अलकाबाईंनी वानखेडेला जाब विचारला. तर जाब विचारताच वानखेडे आणखीनच भडकला आणि अलकाबाईंना शिवीगाळ करत घरात घुसून मारेन, अशी धमकी दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी वानखेडे यास समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे पवार शेतकरी दाम्पत्य हताश होऊन तेथून निघून गेले. 


पोलिसात गुन्हा दाखल...


वानखेडे याने शिवीगाळ केल्याने गरीब शेतकरी पवार दाम्पत्य तेथून निघून गेले. पण या घटनेचा व्हिडीओ काही वेळाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ पाहिल्यावर सगळीकडे संताप व्यक्त होऊ लागला होता. त्यामुळे अनेकांनी पवार दाम्पत्याला हिंमत दिली आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी (11 एप्रिल) अलकाबाई साहेबराव पवार यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गटसचिव बाळू वानखेडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :  


Transfers : मराठवाड्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे बदली?