Samruddhi Mahamarg News: छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री वाहनांवर तुफान दगडफेक (Stone Throwing) करण्यात आल्याची घटना समोर आली असतानाच, आता याच समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) लुटमारीची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर एका टोळक्याने वाहन चालकाला बंदूक, तलवारीचा धाक दाखवून लुटले आहे. तर या वाहनचालकाच्या दोन अंगठ्या, रोख 65 हजार रुपये असा एकूण 85 हजारांचा ऐवज लुटला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या अशा घटनांनी आता समृद्धी महामार्गावरुन रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रशांत जानकर ठोकळ (राहणार सुयश पार्क, नवी मुंबई पनवेल) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तर त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 14 मार्च रोजी ते समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत होते. दरम्यान सावंगी बोगद्याजवळ त्यांचा हायवा वाहन एका टोळक्याने अडवला. त्यानंतर त्या टोळक्याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच बंदुकीचा आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख 65 हजार रुपये असा ऐवज लूटला. एवढंच नाही तर मारहाण केल्यावर त्यांचे हायवा वाहन घेऊन टोळक्यांनी पलायन केले. या घटनेनंतर प्रशांत ठोकळ यांनी फुलंब्री पोलीस ठाणे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. तसेच पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. 


समृद्धी महामार्गावरुन रात्रीचा प्रवास ठरतोय धोकादायक! 


सरकराने मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. मात्र त्यानंतर समृद्धी महामार्गावर होणाऱ्या सततच्या अपघातांची मालिका चिंतेचा विषय ठरत आहे. अशात आता याच समृद्धी महामार्गावरील रात्रीचा प्रवास धोकादायक ठरतोय. त्याचं कारण म्हणजे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळील समृद्धी महामार्गावरील धावत्या प्रवासी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी तुफान दगडफेक केली होती. एकूण तीन वाहनांवर दगडफेक करण्यात आली. ज्यात एक महिला जखमी झाली होती. आता अशातच समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ हायवा वाहन एका टोळक्याने अडवून, लूटमार केल्याने खळबळ उडाली आहे. 


प्रवाशांनी काळजी घ्यावी...


समृद्धी महामार्गामुळे प्रवास सोपा आणि कमी वेळात करणं शक्य होत आहे. त्यामुळे अनेकजण रात्रीचा प्रवास देखील याच मार्गाने करत आहेत. मात्र असे असताना एकाच आठवड्यात घडलेल्या या दोन घटनांनी वाहनधारकांची चिंता वाढली आहे. तर समृद्धी महामार्गावर रात्रीचा प्रवास करताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी देखील समृद्धी महामार्गावर रात्रीचा प्रवास करताना काळजी घेतली पाहिजे. तसेच महामार्गावर बचाव पथक आणि महामार्ग पोलिसांच्या नंबरचे फलक लावण्यात आले असून, अडचणीत वाहनधारक मदत घेऊ शकतात. तसेच 112 वर फोन करुन देखील मदत मागवता येऊ शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


धक्कादायक! समृद्धी महामार्गावर आता चोरांची दहशत; वाहनांवर तुफान दगडफेक, महिला जखमी