Maharashtra Politics News: उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray) उरलेले सर्वच्या सर्व 13 आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उदय सामंत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चांनी जोर धरला  असून, यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. दरम्यान यावरच विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये अस्थिरता आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला कळत असेल की, भाजपचे लोकं कसे त्यांचा यूज अँड थ्रो करतायत, असे दानवे म्हणाले. तर उदय सामंत यांनी अगोदर त्यांचे 16 अपात्र होणारे आमदार थांबवण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्यांचे सदस्यत्व त्यांनी अगोदर सांभाळावं असा खोचक टोलाही दानवे यांनी लगावला आहे. 


दरम्यान पुढे बोलताना दानवे म्हणाले की, तुमचं स्पष्ट बहुमत आहे, तुमच्या बरोबर 50 लोक गेली. तसेच भाजपचे 105 जण देखील शिंदे गटासोबत आहेत.  तरी देखील 13 तुमच्या बरोबर असावेत असे का वाटतय?, याचा अर्थ यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. यासाठीच त्यांना असे आकड्यांचे दावे करावे लागत आहे. तर सामंत हवेतल्या गोष्टी मारतात, असेही दानवे म्हणाले. 


भाजपवर देखील टीका... 


दरम्यान याचवेळी अंबादास दानवे यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. शिवसेना फोडून जनमत बनवण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट येत असल्याचं दानवे म्हणाले. तर भारतीय जनता पार्टी मूर्खाच्या नंदनवनात होती. हे लोक गेले म्हणजे सर्व शिवसेना येईल असे त्यांना वाटत होते. मात्र शिवसेना महाराष्ट्राचा स्वाभिमान असून, ते गद्दारा बरोबर राहू शकत नाही, असेही दानवे म्हणाले. 


अब्दुल सत्तारांना उत्तर...


हनुमानासारखा जसा भक्त असतो, तसं माझी छाती फाडून बघितली तर त्यात विखे पाटील दिसतील, असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर बोलताना दानवे म्हणाले की, हनुमानाच्या नावानं शिव्या देणारे सत्तार हनुमानाचे नाव केव्हापासून घ्यायला लागले. अब्दुल सत्तार यांचं हृदय फार मोठे दिसते. त्यांच्या हृदयात माणिकदादापासून एकनाथ शिंदेपर्यंत अनेक लोक आहेत. हे सर्व असताना त्यांना विखे पाटील दिसत असतील याचा काय वेगळा अर्थ तर नाही ना?  असे दानवे म्हणाले. तसेच शिंदे नसतील तर कोण? असा प्रश्न भाजपच्या मनात असू शकतो. त्यामुळे भाजपमधून विखेंचा प्यादा कोणीतरी हाकत असेल, असेही दानवे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरे गटातील उरलेले सर्व 13 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, उदय सामंतांचा गौप्यस्फोट