Chhatrapati Sambhaji Nagar News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेस नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आज राज्यासह देशभरात काँग्रेसकडून (Congress) सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. तर त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले असून, 'मोदी चोर है' अशा आशयाचे पोस्टर शहरभरात लावले आहेत. विशेष म्हणजे शहरातील सर्वच महत्वाच्या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत. 


सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लगचेच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरोधातील पोस्टर वेगवेगळ्या ठिकठिकाणी लावले आहेत. या पोस्टरवर, "चौकीदार चोर हि नही, डरपोक भी है...हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध...निरव ललित मोदी चोर है (बोल्ड अक्षरात) असे लिहण्यात आले आहे. तर डॉ. निलेश आंबेवाडीकर, विजय कांबळे, आकाश रगडे, मयूर साठे आणि अभिषेक शिंदे यांचे नाव निषेधकर्ते म्हणून या पोस्टरवर उल्लेख करण्यात आला आहे. 


शहरातील ठिकठिकाणी लावले पोस्टर...


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज 'मोदी चोर है' असे आशयाचे पोस्टर शहरात लावले आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसवर हे पोस्टर लावले आहेत. तर शहारतील वेगवेगळ्या पाट्यावर देखील हे पोस्टर लावण्यात आला आहे. सोबतच एसबीआय बँकेच्या काचेवर देखील असे पोस्टर लावले आहेत. तसेच यावेळी 'राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है...नही चलेंगी नही चलेंगी दादागिरी नही चलेंगी.. अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे या हटके पोस्टरची शहरभरात चर्चा पाहायला मिळत आहे. 


काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन 


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने हुकुमशाही पद्धतीने रद्द केली असून, त्यांच्या समर्थनासाठी आज सकाळी 11 वाजता शहरातील शहागंज येथील राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन केले जात असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Modi : राहुल गांधींना अडचणीत आणणाऱ्या 'मोदी' नावाचा इतिहास काय? 600 वर्षांपूर्वी ते गुजरातला कसे आले?