Chhatrapati Sambhaji Nagar News: रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात बातमी छापल्याने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्राची छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) होळी करण्यात आली आहे. भुमरे यांच्या समर्थकांनी पैठणमध्ये 'सामना' वृत्तपत्राची (Saamana News Paper) होळी केली आहे. भुमरे यांच्या मतदारसंघात गुढीपाडवा झाल्यावर आनंदाचा शिधा पोहचला असल्याची बातमी आज सामनामध्ये छापून आली होती. दरम्यान याचाच राग आल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैठणमध्ये 'सामना' वृत्तपत्राची होळी केली आहे. 


दिवाळीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि गुढीपाडवा निमित्ताने रेशन धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी गुढीपाडवा होईपर्यंत नागरिकांना आनंदाचा शिधा मिळालाच नाही. दरम्यान पैठण तालुक्यात देखील गुढीपाडवा झाल्यावर आनंदाचा शिधा पोहचला आहे. तर याबाबत 'गद्दार भुमरेंच्या मतदारसंघात पाडव्यानंतर आला 'आनंदाचा शिधा' या मथळ्याखाली आज सामनामध्ये बातमी छापण्यात आली आहे. तर याचाच राग आल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज पैठणच्या शिवाजी चौकात 'सामना' वृत्तपत्राच्या अंकाला जोडे मारत, पेपरची होळी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 


काय आहे प्रकरण! 


दिवाळीत वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा वाटप करताना पैठण तालुक्यात पॅकेटवर मंत्री भुमरे यांचा फोटो छापण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान यावेळी देखील पैठण तालुक्यात गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा पोहचलाच नाही.  गुढीपाडवा झाल्यावर पैठण तालुक्यातील दोन वेगवेगळ्या शासकीय गोडाऊनमध्ये 28  हजार 768  कीट तयार करण्यात येत आहे. 106 ग्रामपंचायती अंतर्गत 208 रेशन दुकानात हा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. मात्र आनंदाच्या शिध्यात साखर, चणाडाळ आणि रवाच पोहचला असून, पामतेल कीटमध्ये नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेल आल्यावर या कीटचे वापर केले जाणार आहे. दरम्यान याबाबत आजच्या सामनामध्ये 'गद्दार भुमरेंच्या मतदारसंघात पाडव्यानंतर आला 'आनंदाचा शिधा' या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली होती. तर याचाच राग आल्याने भुमरे समर्थकांनी 'सामना'ची होळी केली आहे. 


जोडोमारो करत घोषणाबाजी....


भुमरे यांच्याविरुद्ध सामनामध्ये बातमी छापून आल्याने, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरात सामनाची होळी केली. यावेळी पायातील बूट काढून जोडोमारो देखील करण्यात आले. तसेच 'सामना पेपरचं करायचं काय, खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणाबाजी देखील यावेळी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराविरोधात 1 लाख 48 हजार आक्षेप, समर्थनार्थ केवळ 4166 सूचना