Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका उद्योजकाच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. क्लाससाठी गेलेली मुलगी घरी परतण्यासाठी रिक्षातून प्रवास करत असताना, रिक्षाचालकाने तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने केला आहे. तर वाळूज परिसरात ही घटना घडली असून, या प्रकरणी मुलीसह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तर संबधित रिक्षाचालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 


याबाबत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने वाळूज एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ती वाळूज परिसरात आपल्या आई-वडिलांसह 21 वर्षीय भावासोबत राहते. तर मुलीच्या वडिलांची स्वतःची कंपनी आहे. तर पिडीत मुलगी छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील एका महाविद्यालयात बारावी कॉमर्सचं शिक्षण घेते. दरम्यान, वाळूज भागातील एका क्लासमध्ये एमएससीआयटीचे क्लाससाठी ही मुलगी सकाळी आठ ते 10 वाजेपर्यंत कंप्युटर क्लासेससाठी जात होती. सकाळी तिचे वडील तिला नेऊन सोडत असे, तर क्लास सुटल्यावर ती स्वतः रिक्षातून घरी परत जात होती. 


दरम्यान नेहमीप्रमाणे आज (12 एप्रिल) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या वडिलांसह दुचाकीवरून क्लाससाठी गेली होती. क्लास सुटल्यानंतर पीडित मुलगी रिक्षामधून (एमएच 20 ई.एफ 5547)  घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी ती रिक्षामध्ये एकटीच होती. दरम्यान मुलीच्या घराचे ठिकाण आल्यावर देखील रिक्षा थांबली नाही. त्यामुळे तिने रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवता थोड्यावेळ पुढे जावून थांबवतो असे सांगत, थेट पुढे रिक्षा नेली. रिक्षाचालकाच्या अशा वागण्याने अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरून गेली. तर भीती वाटू लागल्याने ती  आजूबाजूस काही मदत मिळते का यासाठी बाहेर बघत होते.  दरम्यान त्याचवेळी तिला रस्त्याने आपले वडील दिसले. वडिलांना पाहून तिने जोरात पप्पा-पप्पा असा आवाज दिला. मुलीचा आवाज आयकून वडिलांनी रिक्षाचा पाठलाग करून अडवली आणि मुलीची सुटका केली. 


जमावाकडून मारहाण...


मुलीचं घर असलेलं परिसर आल्यावर देखील रिक्षाचालक रिक्षा थांबवत नव्हता. दरम्यान पुढे गेल्यावर मुलीला तिचे वडील दिसले. त्यामुळे तिने वडिलांना आवाज दिला. तिच्या वडिलांनी देखील तत्काळ रिक्षाचा पाठलाग करून, रिक्षा थांबवली. यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील तिथे धाव घेतली. यावेळी मुलीची सुटका केल्यावर, उपस्थित नागरिकांनी रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला. तसेच याबाबत पोलिसांना माहिती देऊन, रिक्षाचालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर मुलीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून, वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! छ. संभाजीनगरमधील राड्यातील गायब झालेल्या आरोपींना पोलीस करणार फरार घोषित