Chhatrapati Sambhaji Nagar: रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या राजकीय करिअरची जेथून सुरूवात झाली. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे (Sant Eknath Cooperative Sugar Factory) संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तसेच या कारखान्यावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) शरद जरे यांनी सोमवारी प्रशासक नियुक्त केला आहे. तसेच 6 महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे. स्थानिक राजकीयदृष्ट्या ही मोठी घडामोड समजली जात असून, भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे. तसेच पुढील निवडणूक होईपर्यंत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मुकेश बारहाते व फुलंब्री येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) व्ही. पी. रोडगे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पैठण आणि जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेल्या संत एकनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 30 जून रोजी संपुष्टात आली. दरम्यान कोरोनाच्या संकटात निवडणुका घेता आल्या नसल्याने, तत्कालीन संचालक मंडळास कामकाज पाहण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र असे असताना संचालक मंडळास 1 मार्च पूर्वी मतदार यादीसह निवडणूक निधी भरण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने दिले. परंतु निधी व मतदार यादी सादर न केल्याने संचालक मंडळास नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश, भाजपला धक्का
संत एकनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाकडून मतदार यादीसह निवडणूक निधी जमा करण्यात येत नसल्याने प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने त्यांना नोटीस देऊन सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितले होते. दरम्यान सोमवारी याबाबत झालेल्या सुनावणीत भाजप नेते तथा चेअरमन तुषार शिसोदे यांनी निधी व मतदार यादी सादर करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती केली होती. परंतु साखर सहसंचालकांनी शिसोदे यांची विनंती फेटाळून प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे तुषार शिसोदे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
भुमरेंची पुन्हा सत्ता येणार?
पैठण तालुक्याच्या राजकारणात संत एकनाथ कारखाना नेहमीच प्रमुख मुद्दा राहिला आहे. विशेष म्हणजे मंत्री संदिपान भुमरे यांचा या कारखान्यावर वर्षोनुवर्षे वर्चस्व राहिले. परंतु सर्व विरोधकांनी एकत्र येऊन हा कारखाना भुमरेंच्या ताब्यातून ओढून आणला. त्यामुळे भुमरे यांनी शरद कारखाना पुन्हा एकदा सुरु करून संत एकनाथ कारखान्यापासून लांब राहणे पसंद केले. मात्र सध्या भुमरे मंत्री आहेत. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. अशात आता कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पुढील सहा महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भुमरे संथ एकनाथ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतील का? अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ठाकरे गट Vs शिंदे गट! शिरसाटांच्या प्रतिमेला जोडे मारो केल्याने शिवसेना महिला आघाडी पोलिसात जाणार