Chhatrapati Sambhaji Nagar News: सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचे बनावट खाते तयार करून पैशांची मागणी करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात अधिकच वाढले आहे. मात्र आता तर चक्क एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटरवर अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या नावाने ट्विटरवर बनावट खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


एका सायबर भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडले होते.त्यानंतर या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट टाकली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली आहे. 


अखेर बनावट खाते बंद...


दरम्यान या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळविले. अनेक ठिकाणांवरून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला रात्री 11  वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले. तसेच या सायबर भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तर ट्विटरवर माझे कोणतेही खाते नसून, नागरिकांनी सायबर भामट्यांच्या पोस्टला बळी पडू नयेत, असे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केले आहे.  मात्र तोपर्यंत अनेकांची फसवणूक झाली होती. 


कोण आहेत मोक्षदा पाटील... 


आयपीएस मोक्षदा पाटील यांची लेडी सिंघम म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत जिथे-जिथे काम केले त्याठिकाणी त्यांच्या कामाची चर्चा झाली. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक असताना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची मोठी चर्चा झाली होती.  त्यांचे पती आस्तिककुमार पांडेय हेदेखील आयएएस अधिकारी असून, ते सध्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आहेत. त्यामुळे या अधिकारी दाम्पत्याची नेहमी चर्चा होत असते. तर मोक्षदा पाटील या सध्या छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग अधीक्षकपदी कार्यरत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर पुन्हा दगडफेक; रात्रीचा प्रवास ठरतोय धोकादायक