Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड तालुक्यात पुन्हा एकदा दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत मशीदसमोर डीजे वाजवण्याच्या कारणावरून वऱ्हाडी मंडळीत आणि गावातील एका गटात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे स्वरूप थेट चाकूने हल्ल्यात व दगड विटांचा मारहाणीत रुपांतर झाले. या तुंबळ हाणामारीत दोघे जण जखमी झाले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.तर दोन्ही गटाच्या 80 ते 100 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्या या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 


अधिक माहिती अशी की, कन्नडच्या शेलगाव येथे फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील मंडळी लग्नसोहळ्यासाठी आली होती. लग्नातील नवरदेवाची वरात मिरवणूक सुरू असताना वरात शेलगाव येथील मशिदीसमोर आली. यावेळी काही लोकांनी मशीदसमोर डीजे बंद करण्याची विनंती केली. मात्र मशिदीसमोर डीजे वाजवू नका, तशी प्रथा आमच्या गावात नाही असे एकाने वरातील नाचणाऱ्या तरुणांना सांगितले. बोलताबोलता वाद वाढला. एका गटाच्या आरोपीने थेट चाकूने दुसऱ्या गटाच्या व्यक्तीवर हल्ला करत वार केला. हल्ल्यात दोन्ही गटांतील दोघे गंभीर जखमी झाले.


पोलीसांवर विटा फेकल्या...


दरम्यान घटनेची माहिती मिळताच जेव्हा पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा शेलगाव येथील 15  पुरुष, महिला त्यांच्या गाडीला आडव्या झालेत. तर काहींनी विटा मारल्या. त्यामुळे या सर्व पंधरा पुरुष व महिलांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353 चा गुन्हा पिशोर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर पिशोर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांच्यासह पोलिसांचा मोठं बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे. 


80 ते 100 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल...


तर या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा पिशोर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या काहीजणांविरुद्ध गुन्हे नोंदण्यात आले आहेत. दोन गटांत वाद होण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य करून चिथावणी दिली, जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू, दगड, विटाच्या सहायाने गंभीर जखमी केले म्हणून पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यात एका गटाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून सलाम पटेल, नवीद पटेल, शोहेब पटेल, आवेश पटेल (सर्व रा. शेलगाव) यांना तर दुसऱ्या गटाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून संतोष रंगनाथ सोनवणे, लक्ष्मण सूर्यभान गाडेकर, नितीन त्र्यंबकराव राऊतराय, समाधान रावसाहेब गायकवाड, अक्षय भीमराव मुरे, नारायण रंगनाथ सोनवणे, राजू कचरू काटकर, (सर्व रा. निधोना दोन ता. फुलंब्री) नवनाथ रंगनाथ दाभाडे (रा. सोनारी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर 80 ते 100 अज्ञात लोकांचा देखील आरोपींमध्ये समावेश आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ तातडीने 30 हत्यारबंद पोलिस पोहचणार; छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांची माहिती