Chhatrapati Sambhaji Nagar ACB News: राज्यातील 385 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करत त्यांना फौजदार (PSI) पदाचा दर्जा देण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी रात्री काढले. दरम्यान याच यादीत छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील (Chhatrapati Sambhaji Nagar City Police) काही कर्मचाऱ्यांचे देखील नावं आहेत. ज्यात सातारा पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी मच्छिंद्र बापुराव ससाणे (वय 55, रा. ग.नं.2, हनुमानगर, दत्ताचौक, गारखेडा) यांचा देखील समावेश होता. पण पदोन्नती झाल्याने बुधवारी दिवसभर पुष्पगुच्छ स्वीकारणाऱ्या ससाणेच्या हातात गुरुवारी बेड्या पडल्या. 24 हजार रुपयांची लाच घेतना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे ज्या सातारा पोलीस ठाण्यात बुधवारी दिवसभर पुष्पगुच स्विकारले, सर्वांनी अभिनंदन केले, त्याच पोलीस ठाण्यात ससाणेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मच्छिंद्र ससाणे याच्याकडे कौटुंबिक वादातुन दाखल असलेल्या एका प्रकरणात गुन्ह्याचा तपास होता. तर या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी ससाणे याने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान तडजोडीअंती 24 हजार रुपयांमध्ये व्यवहार फायनल करण्यात आला. पण तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने थेट एसीबी कार्यालय गाठत तक्रार नोंदवली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची खात्री करत सापळा रचला. त्यानंतर संताजी पोलिस चौकीजवळ तक्रारदाराकडून पैसे घेताना मच्छिंद्र ससाणे यास एसबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
एकाच दिवशी दोन कारवाया!
दरम्यान दुसऱ्या एका कारवाईत आणखी एक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे हा फौजदार देखील छत्रपती संभाजीनगरच्या शहर पोलीस दलातच कार्यरत आहे. सिडको पोलिस ठाण्यात फौजदार म्हणून कार्यरत असलेल्या नितीन दशरथ मोरे (वय 47) याच्यावर अर्ज निकाली काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. प्रापर्टीविषयी दाखल तक्रार अर्जात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दाखल केल्यास आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे नितीन मोरे याने 20 हजार रुपयांची मागणी केली होती. शेवटी तडाजोडीत 12 हजार रुपयात व्यवहार ठरला. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा लावत सिडको पोलीस ठाण्याच्या पाठीमागील साई रसवंतीमध्ये 12 हजार रुपये लाच घेताना मोरे याला रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे मोरे हा देखील चार महिन्यांपूर्वीच फौजदार झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या: