Rename to Chhatrapati Sambhaji Nagar : औरंगाबाद शहराचं (Aurangabad City) नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) केल्यानंतर या नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी सोमवार (27 मार्च) शेवटचा दिवस होता. त्यामुळे हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान सोमवारी मुदत संपेपर्यंत छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ एकूण 4 लाख 3 हजार 15 अर्ज दाखल करण्यात आले असून, नामांतराविरोधात 2 लाख 73 हजार 210 हरकती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक विभागात दाखल झाले आहेत. तर धाराशिव नामांतराच्या समर्थनार्थ 117 तर विरोधात 28 हजार 614 अर्ज आयुक्तालयात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. तर शहरातील वेगवेगळ्या भागात कॅम्प लावून लोकांकडून अर्ज भरून घेतले जात होते. ग्रामीण भागात देखील वेगवेगळ्या गावात बैठका घेऊन गावकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. दोन्ही बाजूने अधिकाअधिक अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान सोमवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे.तर शेवटच्या दिवशी लाखो अर्ज दाखल झाले.
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ सोमवारी दिवसभरात भाजप तसेच सकल हिंदू समाज एकत्रीकरण समितीतर्फे 3 लाख 91 हजार 839 सूचना देण्यात आले. तर नामांतराच्या विरोधात एमआयएम तसेच विविध संघटनांच्या वतीने 1 लाख 20 हजार 907 आक्षेप-हरकती सोमवारी दिवसभरात दाखल करण्यात आले. त्यामुळे सोमवारी मुदत संपेपर्यंत छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ एकूण 4 लाख 3 हजार 15 अर्ज दाखल करण्यात आले असून, नामांतराविरोधात 2 लाख 73 हजार 210 हरकती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक विभागात दाखल झाले आहेत.
कागदपत्रे मंत्रालयात पाठवले जातील
नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात आतातपर्यंत जमा केलेल्या सर्व अर्जांची मोजणी प्रशासनाकडून केली जाईल. त्यानंतर संगणकावर या सर्व अर्जांची नोंदणी होईल. पुढील 15 दिवस ही प्रक्रिया चालेल. त्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार सर्व कागदपत्रे मंत्रालयात पाठवले जातील.
विभागीय कार्यालयात दिवसभर गर्दीच गर्दी
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी दोन्ही बाजूने लाखो अर्ज आले. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दिवसभर गर्दी पाहायला मिळाले. प्रशासनाचे 25 अधिकारी वेगवेगळ्या तीन ठिकाणी अर्ज स्वीकारत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या :
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर नामांतरासाठी अर्ज युद्ध; हरकतीचा अक्षरशः पाऊस