Mahavikas Aghadi Sabha: शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेतला असून, याची सुरवात 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) होणार आहे. त्यामुळे या सभेसाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षातील स्थानिक नेतेमंडळी कामाला लागले आहेत. सभेला मोठ्याप्रमाणावर गर्दी जमवण्यासाठी महाविकास आघाडीकडून बैठकावर बैठका घेतल्या जात आहे. विशेष म्हणजे या सभेची प्रमुख जबाबदारी ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. 'वज्रमुठ सभा' असे या सभेचे घोषवाक्य असणार आहे.
येत्या 2 एप्रिल महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षातील नेतेमंडळी कामाला लागले आहेत. तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आज सकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्तंभपुजन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे देखील उपस्थित होते.
सभेसाठी बैठकांवर-बैठका...
दरम्यान 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी मोठी तयारी तिन्ही पक्षाकडून करण्यात येत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार असल्याने, सभेला गर्दी जमवण्याचे देखील आवाहन तिन्ही पक्षांसमोर असणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून यासाठी बैठका घेण्यात येत आहे. तर चंद्रकांत खैरे गेल्या आठवड्याभरापासून छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाअधिक कार्यकर्ते सभेसाठी आणण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे.
अंबादास दानवे पहाटेपासून घराबाहेर...
छत्रपती संभाजीनगर शहरात 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला यशस्वी करण्याची प्रमुख जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे दानवे यांच्याकडून सभेची जोरदार तयारी केली जात आहे. तर आज भल्या पहाटे शहरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिक, विद्यार्थी यांची भेट घेऊन दानवे यांनी सभेचं आमंत्रण दिले. तर दानवे यांनी हर्सूल जेल परिसरातील मैदान, विद्यापीठ विद्यापीठ परिसर, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा न्यायालय परिसरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना सभेचे निमंत्रण दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार 'धनुष्यबाण यात्रा'; छ. संभाजीनगरमधून सुरुवात