Maharashtra Government Staff Strike: जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government Employees) पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. तर संपावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या संपाचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. तर याचा सर्वाधिक परिणाम सरकारी रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत असून, रुग्णालयात अतिशय बिकट अवस्था आहे. शासकीय रूग्णालयातील नर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारीही संपात सहभागी असल्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणी आणि शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) शासकीय घाटी रुग्णालयात पहिल्याच दिवशी नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कर्मचारी देखील संपावर गेल्याने याचे परिणाम रुग्णांवर होताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयातील 700 परिचारिका आणि 434 चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे घाटीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढावे लागत आहेत. तर सध्या फक्त इमर्जन्सी उपचार करण्यात येत आहेत. शासकीय घाटी रुग्णालयात दररोज सुमारे 1200 रुग्ण दाखल होत असतात, मात्र संपामुळे मंगळवारी 956 रुग्णांची नोंद झाली आहे.

नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द...

छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी येत असतात. सर्वसामान्य आणि गोरगरिबांचं रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात रोज अनेक शस्त्रक्रिया पार पडत असतात. मात्र रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेल्याने मंगळवारी नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे. तर घाटीत दिवसभरात 33 प्रसूती झाल्या असून त्यापैकी आठ सिझेरियन झाल्याच्या नोंद करण्यात आली आहे. तर संपावर तोडगा निघाला नसल्याने आजच्या नियोजित शस्त्रक्रिया देखील तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

जिल्ह्यातील परिस्थिती...

रुग्णालय संपावर  पर्यायी 
घाटी रुग्णालय 1,134 315
कॅन्सर हॉस्पिटल  100 50
जिल्हा रुग्णालय 107 30
ग्रामीण रुग्णालय 235 406
प्राथमिक आरोग्य केंद्रे  377 00

ग्रामीण भागात परिणाम...

शासकीय कर्मचारी यांच्या संपाचा सर्वाधिक परिणाम आरोग्य विभागात जाणवत आहे. दरम्यान ज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठ फटका बसत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्राचे 377 कर्मचारी संपावर गेले असून, त्यांच्या जागी कोणतेही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी आता खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. तर अनेक गावात खाजगी रुग्णालय उपलब्ध नसल्याने त्यांना तालुक्याच्या किंवा बाजारपेठ असलेल्या गावात जाण्याची वेळ आली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra government staff strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस; रुग्णसेवेला मोठा फटका.. सरकारी कार्यालयांमधलं कामकाज ठप्प