Ambadas Danve: छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात 5 ते 7 मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंचनामे करण्याचे आदेश देऊनही अजूनही अनेक भागात पंचनामे झालेच नसल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान यावेळी अनेक भागात पंचनामे झालेच नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असल्याचं दानवे म्हणाले आहेत. 


गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील अनेक भागातील शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करत विरोधकांनी अर्थसंकल्पात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. 


मात्र असे असतानाही अद्याप नुकसानीचे पंचनामेच झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी दानवे यांना सांगितले.आज दानवे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुका, ढोपटेश्वर शिवार येथील शेतकरी नाथाराम शेळके यांच्या शेतातील डाळिंब फळांचे नुकसानाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील देमनी वाहेगाव,शेकटा येथील नुकसानग्रस्त शेतकरी साईनाथ तांगडे यांच्या शेतातील बांधावर जाऊन गहू, हरभरा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.


शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभागृहात आवाज उठवणार


उभी पिकं हाताला आलेली असताना अवकाळी पावसामुळे डाळींब, मोसंबी ही फळं व हरभरा, गहू पिकं नष्ट झाली आहेत. आता दुसरं पिकं घेण्यासारखीही स्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 33 टक्के नुकसानीचे निकष न लावता सरसकट मदत द्यावी, अशा सूचना दानवे यांनी संबंधित तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिल्या. तर एकीकडे शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाने घाला घातला आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं. सततच्या पावसाची मदत अद्याप मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली.


यावेळी कृषी अधिकारी बनसोडे तथा तहसीलदार सुमन मोरे व शिवसेना पदाधिकारी माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर प्रमुख, जयप्रकाश चव्हाण उपजिल्हाप्रमुख, भगवानराव कदम किसान सेना तालुका, अध्यक्ष नंदू दाभाडे आदी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Rain : शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील आठवड्यात मराठवाड्यात पुन्हा पाऊस