Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात तो एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळताना पाहायला मिळत आहे. फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील हा व्हिडिओ असून, मंगेश साबळे असे या तरुण सरपंचाचे नाव आहे. गटविकास अधिकारी यांनी विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने, त्यांच्या कार्यालयासमोर दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा दावा या सरपंचांने केला आहे. विशेष म्हणजे त्याने गळ्यात नोटांचा हार घालत पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर पैसे उधळले असल्याचे पाहायला मिळाले. 


वेगवेगळ्या शासकीय योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहे. मात्र फुलंब्री तालुक्यात अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान असेच काही फुलंब्री तालुक्यातील गेवराई (पायगा) येथील गावकऱ्यांसोबत घडत असल्याचा आरोप या गावचा सरपंच मंगेश साबळे याने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने अनोखं आंदोलन केले आहे. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटाचा हार गळ्यात घालून तो पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल झाला. त्यानंतर त्या नोट्या कार्यालयाच्या परिसरात उधळून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेध करत असल्याचा दावा केला. 


काय आहे व्हिडिओमध्ये...


फुलंब्री तालुक्यातील गेवराई येथील शेतकऱ्यांकडे विहीर मंजुरीसाठी गटविकास अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप मंगेश याने या व्हिडिओमध्ये दावा केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार शेतकऱ्यांचा असल्याचा दावा केला होता. मात्र इथे शेतकऱ्यांकडेच लाच मागितली जात असल्याचा आरोप साबळे याने केला आहे. तसेच आपण शेतकऱ्यांकडून दहा-दहा हजार रुपये घेऊन दोन लाख रुपये जमा करून गटविकास अधिकारी यांना देण्यासाठी आणले असल्याचा दावा मंगेशने केला. तसेच हे कमी असतील तर आणखी पैसे जमा करून विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात देखील आंदोलन करण्याचा इशारा साबळे याने या व्हिडिओत दिला. 


प्रसिद्धीसाठी पैसे उधळल्याचा आरोप...


दरम्यान मंगेश साबळे याने यापूर्वी देखील आगळेवेगळे आंदोलन केले आहेत. त्यामुळे त्याच्या आंदोलनाची माध्यमात अनेकदा बातम्या देखील होतात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रसिद्धीसाठी असे आंदोलन तर केले जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यावर त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार का केली नाही. शेतकऱ्यांकडून त्यांच्या कष्टाचे जमा केलेले पैसे असे रस्त्यावर कसे उधळतात, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.  



इतर महत्वाच्या बातम्या : 


छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात दोन गटात वाद; परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन