Congress Protest : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या आरोपांवरून काँग्रेस (Congress) पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर आज राज्यातील अनेक भागात भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून ‘जबाब दो मोदी सरकार जबाब दो' आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्याप्रमाणावर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे व शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'जबाब दो मोदी जबाब दो' अशा घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आधी नवी मुंबई येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा कार्यकमात उष्माघातामुळे मृत्युमुखी पावलेल्या श्री सदस्यांना जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन
यावेळी बोलताना आंदोलक म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते तथा जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व 300 कोटीच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये 40 जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चुक असणे हे निदर्शनास आणून दिले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगीतले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही, असे आरोप करण्यात आले.
शेतकर्यांच्या मृत्युला जबाबदार कोण?
तर माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे मोदींनी उत्तर द्यावेत. शेतकर्यांना देशोधडीला करणार्या तीन काळ्या कायद्यांबद्दल आणि हे काळे कायदे पुन्हा घेण्यासाठी आंदोलन करतांना शहीद झालेल्या 750 पेक्षा जास्त शेतकर्यांच्या मृत्युला जबाबदार कोण? याचे उत्तर मोदींनी द्यावे. पीक विम्याच्या नावाखाली अदानी-अंबानी साठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची तिजोरी लुटून देणारे कोण? याचे उत्तर मोदींनी द्यावे... त्यामुळे वरील प्रश्नांवर ‘जबाब दो मोदी जबाब दो' हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलक म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: