Kirit Somaiya in Aurangabad : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुण्यातील गुप्त भेटीनंतर गेल्या चार दिवसांपासून यावर राजकीय चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गुप्त बैठकीबाबत वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज लावले जात आहे. पण, राज्यात या गुप्त भेटीची चर्चा असतानाच आता आणखी एक गुप्त भेट समोर आली असून, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कारण, भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) बुधवारी रात्री अचानक औरंगाबादमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एक गुप्त बैठक देखील घेतली. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नामांकित सीए उपेंद्र मुळे यांची सोमय्यांनी भेट घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते बॅकफूटवर गेल्याचे बोलले जात होते. अशातच सोमय्या अचानक बुधवारी रात्री औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांचे माजी सीए उपेंद्र मुळे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे सोमय्या यांची अचानक झालेल्या या भेटीची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तर सोमय्या यांनी ज्यांची भेट घेतली ते सीए उपेंद्र मुळे भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी प्रकरणावेळी चर्चेत आले होते. भावना गवळी यांनी आपल्याला खोटे आणि चुकीचे कागदपत्रे बनवण्याचं सांगितले होते असा आरोप मुळे यांनी केला होता. तसेच आपल्या जीवाला धोका असून, आपल्याला गवळी यांच्या लोकांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही मुळे यांनी केला होता. त्यामुळे सोमय्या यांनी मुळे यांची भेट का घेतली असावी?, या भेटी मागचे कारण काय?, तसेच ही गुप्त भेट का ठरली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, अजूनही या भेटीचे तपशील कळू शकले नाही. तर,सोमय्या रात्री शहरातच मुक्कामी होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
किरीट सोमय्या बुधवारी रात्री अचानक औरंगाबाद शहरात दाखल झाले. तसेच त्यांनी सीए उपेंद्र मुळे यांची गुप्त भेट घेतली. दरम्यान, सोमय्या यांच्या या दौऱ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. सोमय्या यांना सरकारने विशेष सुरक्षा पुरवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी 100 पेक्षा अधिक पोलीस तैनात होते. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकसह अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात असल्याचे दिसून आले. तर अनेक पोलीस कर्मचारी साध्या वेशात या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे या भेटीच्या दरम्यान मुळे यांच्या घराला अक्षरशः छावणीचे स्वरुप आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांचा 'तो' व्हिडीओ खरा, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती