छत्रपती संभाजीनगर : राम (Ram) हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, असे असतानाच आता शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. "जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई निश्चित होईल, तसे आदेशही दिले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत संभाजीनगरात बोलणं होईल आणि कारवाईची मागणी आम्ही करू, असे शिरसाट म्हणाले आहेत.
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की,“ राम मंदिर उद्घाटनानिमित्त काही लोक उगाच भावना भडकवत आहे. ती वक्तव्य चीड आणणारी आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. हे का करत आहेत आणि तेही राष्ट्रवादीच्या मेळाव्यात. कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये याना समाजसमाजात तेढ निर्माण करायची आहे. तसेच याचा फायदा घ्यायचा आहे,"असेही शिरसाट म्हणाले.
आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे बोलत नाही
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर शरद पवार बोलत नाही, उद्धव ठाकरे बोलत नाही. यांना जातीय दंगली घडवायचा आहेत की काय? असा संशय येतो. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची गरज आहे. गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करताय याला आहारी जाऊ नका. आडवे येणाऱ्या मांजरांना जनता धडा शिकवेल. श्रीराम मांसाहार करायचे याचे दाखले देणे सुरु आहे. पण यासाठी हीच वेळ का?, मग दाखले का देत नाही. यांच्यावर कारवाई निश्चित होईल, तसे आदेशही दिले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरात येणार आहे त्यांच्याकडे आम्ही देखील कारवाईची मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत.
सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन होणार नाही...
सिल्लोड येथील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली वक्तव्य आणि पोलिसांना लाठीचार्ज करण्याच्या आदेशावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, "अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याचे समर्थन नाही, त्याला पाठिंबाही नाही. जाहीरपणे असे बोलणे योग्य नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांचे बोलणे झाले आहे. आज सुद्धा सत्तार आणि मुख्यमंत्री बोलतील. त्यानंतर मी सांगेल नक्की काय झालं,” असे शिरसाट म्हणाले.
मनसे युतीबाबत 22 जानेवारीनंतर बैठका!
मनसे आणि महायुतीमधील युतीबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले की, “राज ठाकरे महायुतीत आल्यास निवडणुकीत याचा फायदा होईल, त्यामुळे ते आपल्या सोबत यायला पाहिजे याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोललो आहे. आणि हे प्रत्यक्षात होईल. आमची भूमिका आहे मनसेने सोबत यायला पाहिजे. 22 जानेवारीनंतर बैठका सुरु होईल आणि यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे,”असे शिरसाट म्हणाले.
फोन टॅपिंग करण्यासारखे कृत्य करू नका...
रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी झालेली नेमणूक रद्द करा अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्यांनी केली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी असे बोलणे योग्य नाही. एक महिला अधिकारी या पदावर जाते, तिचे अभिनंदन करायला पाहिजे. राहिला प्रश्न फोन टॅपिंगच्या आरोपाचा, तर असले कृत्य करू नका की फोन टॅपिंग करायची वेळ येईल, असे शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jitendra Awhad : आव्हाडांना डोक्याचा 'नारू' झालाय; मनसे नेते प्रकाश महाजनांची जहरी टीका