छत्रपती संभाजीनगर : शिंदें समितीच्या शिफारशीनंतर राज्य सरकारकडून कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरणास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात 75 पेक्षा जास्त मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. मात्र, कुणबी जात प्रमाणपत्र मिळतात कसे,  कशा पद्धतीने हे सगळं काम चालतंय, तुम्हाला कोणते कागदपत्रे सोबत न्यावे लागणार, शासनाचे कोणते कागदपत्र तुमच्या फायद्याचे ठरणार याबाबतचा आढावा 'एबीपी माझा'ने घेतला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून याचा डेमो देण्यात आला आहे. 


कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे...



  • 1967 च्या अगोदरचा कुठलाही पुरावा आवश्यक, ज्यावर कुणबी असल्याची नोंद असायला हवी.
    (खासरा पत्र, पाहणी पत्र, कुळ नोंद वही, नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना न. 1 हक्कनोंद पत्रक, सातबारा उतारा, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम नोंद वही, आदी कुणबी नोंद असलेले कागद, मोडी, उर्दू, भाषेत असलेले दस्तावेज भाषांतर करून अटेस्टेड करून घेणे)

  • 100 रुपयांच्या बॉण्डवर वंशावळ प्रतिज्ञा पत्र

  • अर्ज करणारा व लाभार्थींचे टिसी, आधार कार्ड 


शासकीय प्रकिया...



  • वरील सर्व कागदपत्र घेऊन आपले सरकार केंद्र, पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचा.

  • अर्ज केल्यानंतर सदरील अर्ज त्या-त्या तहसील, उपविभागीय अधिकारी स्तरावर या सर्व कागदपत्रांची छाननी केली जात आहे.

  • उमेदवाराने ज्या विभागाची कुणबी असलेली नोंद कागदपत्र दिले आहे, त्या विभागाकडून सरकारी पातळीवर हे कागदपत्र खरे असल्याचा निश्चित केले जाणार.

  • सर्व कागदपत्र व्यवस्थित असले की, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून त्यांच्या स्तरावर कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार.


जिल्हास्तरीय विशेष कक्ष सुरु...


दरम्यान, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विषेश कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील असेच जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत 75 पेक्षा अधिक दाखले वाटप झाले आहेत. ज्यात, जिल्हास्तरीय विशेष कक्ष अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे उपस्थित राहुन विविध विभागांशी समन्वय साधणे, अभिलेखे उपलब्ध करुन घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करुन त्याबाबत विहित नमुन्यातील अहवाल कार्यालयास व समितीस सादर करणे इ.कामे विहित कालमर्यादेत करण्यात येत आहेत. या शिवाय न्यायालयातील जुन्या अभिलेख्यांमध्ये देखील कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी असे जातीवाचक उल्लेख असलेले (सन 1967 पुर्वीचे) अभिलेखे उपलब्ध करुन देणे बाबत संबंधित न्यायालयाकडे विनंती करुन अभिलेखे उपलब्ध करुन घेण्यात येत आहेत.


कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो; पाहा व्हिडिओ 



इतर महत्वाच्या बातम्या: 


आता शेवटची संधी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन लागलं कामाला; मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन