छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील करमाड, जयपुर, भांबुर्डा, लाडगाव आणि कुंबेफळ यासह आसपासच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे या शिवारातील असणारे लहान-मोठे ओढे आणि नद्यांना काही काळ मोठ्या प्रमाणात पूर (Flood) आला होता. याशिवाय शेतातही मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याचे पहायला मिळाले.


येत्या काही दिवसांमध्ये देशभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 3 जुलैपासून मान्सूनचा जोर वाढू शकतो. मान्सून (Monsoon 2024) जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरुन काढेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसण्याची शक्यता आहे.


मुंबईला चार दिवस ऑरेंज अलर्ट


नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यामुळे पुढील आठ दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मुंबईसह पश्चिम किनारपट्टी, कोल्हापूर, सातारा, उत्तर महाराष्ट्र  आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  आहे. रविवारी पश्चिम किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर होता. मुंबईला पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत कालपासून अधुनमधून पावसाच्या सरी बरसत असल्या तरी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मुंबईत 7 जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र, मान्सून लवकर येऊनही मुंबईत हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांची पाणीकपात कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुरळक अपवाद वगळता मुंबईत पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. रविवारी दिवसभरात पावसाच्या सरी बरसल्या. मात्र, पाऊस थांबून थांबून पडत असल्याने अद्याप वातावरणातही म्हणावा तसा गारवा निर्माण झालेला नाही. पावसाच्या या खंडामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे जून महिना संपत आला तरीही शहरातील पाणीकपात सुरु आहे. त्यामुळे आता जुलै महिन्यात तरी मुंबईत पावसाची ही तूट भरून निघणार का, हे पाहावे लागेल. आज सकाळपासून मुंबईत पाऊस थांबलेला आहे. मात्र, आकाश काळ्या ढगांनी व्यापल्याने पावसाची शक्यता आहे.


आणखी वाचा


गेला 'मान्सून' कुणीकडे? पावसाने फिरवली पाठ; पुण्यात 122 %, आत्तापर्यंत तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस?


गुड न्यूज, मान्सून जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरुन काढणार, पुढच्या तीन चार दिवसात कुठं पाऊस पडणार?