छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला आहे. सिल्लोड या ठिकाणी बुधवारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला. धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असेही सत्तार म्हणाले. 


नेमकं काय घडलं? 


मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचले. त्यांनी पोलिसांना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरुण काही ऐकायला तयार नव्हते. मग काय सत्तार यांचा पारा आणखीनच चढला. सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना जेलमध्ये टाकण्याचे सूचना दिल्या. सत्तार यांनी आदेश देताच बंदोबस्तसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी थेट समोर बसलेल्या लोकांवर लाठीच्या सुरू केला. पोलिसांकडून लाठीमार होताच एकच धावपळ उडाली. दिसेल त्याला पोलीस लाठ्याने मारत होते.


यांना कुत्र्यासारखं मारा...


अब्दुल सत्तार एवढयावर थांबले नाही. गोंधळ घालणाऱ्या लोकांना मारा असे सतत पोलिसांना सूचना देत होते. तसेच, गोंधळ घालणाऱ्या या लोकांना कुत्र्यासारखं मारा असंही अब्दुल सत्तार म्हणाले. सोबतच इथे 1 हजार पोलीस आहे, 50 हजार लोकांना मारायला काय लागतो असं धक्कादायक वक्तव्य देखील अब्दुल सत्तार यांनी केलं. तर, गोंधळ घालणाऱ्या लोकांना मारल्यावर जेलमध्ये टाका असे आदेश देखील अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना याच कार्यक्रमात दिले.


विजय वडेट्टीवार यांची टीका..


यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ट्वीट करत म्हटले आहे की, "महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा... मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का?...सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम?, असे वडेट्टीवार म्हणाले.






इतर महत्वाच्या बातम्या: 


प्रभू श्रीरामाबाबतचं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांना भोवणार? भाजप आक्रमक, आमदार राम कदम तक्रार दाखल करणार