Marathwada Ganpati Visarjan 2023 Live Updates: बाप्पा चालले गावाला...; छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील बाप्पांना आज निरोप

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज गणरायाला निरोप दिले जाणार असून, छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालन्यात देखील गणेश विसर्जन मिरवणुका पाहायला मिळणार आहे.

मोसीन शेख Last Updated: 28 Sep 2023 07:06 PM
जालन्यातील मानाचा नवयुवक गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, खोतकर पिता-पुत्रांचा सहभाग

Jalna : जालन्यातील प्रसिद्ध चांदीचा गणपती आणि 76 वर्ष जुन्या मानाच्या नवयुवक गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत डमरु पथकाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या मिरवणुकीत माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी डमरू वाजवत मानाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. दुसरीकडे ढोल पथकांमुळे चौका चौकात या गणपती मिरवणुकीचा उत्साह वाढत चालला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : गणेश विसर्जन तलावाची संभाजीनगर पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात गणेश विसर्जनाला सुरवात झाली असून, मोठा उत्साहात भक्त मिरवणुकीत सहभागी होतांना दिसत आहे. दरम्यान, गणपती विसर्जन तयारी पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवलाई तांडा येथील गणपती विसर्जन तलावाची पाहणी कलवानीया यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. सोबतच पोलिसांना सूचना देखील दिल्या.





Sillod Ganpati Visarjan : सिल्लोडला गणेश विसर्जनाला सुरुवात, मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित

Sillod Ganpati Visarjan : सिल्लोड येथे गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. सिल्लोड शहर व तालुका गणेश महासंघाच्या गणेशाचे सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विधिवत पूजा आरती करून विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह गणेश महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Parbhani Ganpati Visarjan : परभणीत आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा अधिक गणपतींचे विसर्जन

Parbhani Ganpati Visarjan : मागील 10  दिवसांपासून मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वत्रच बाप्पाना निरोप दिला जातोय. तर, परभणीत सुद्धा लाडक्या गणपती बाप्पाना निरोप दिलाय जातोय. सकाळपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर सार्वजनिक गणपती असो की, घरगुती गणपती यांचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे याच ठिकाणी शहरातील आणि आसपासच्या सर्व गणपतींचे विसर्जन केले जात आहे. यावेळी परभणीकर कुटुंबासह या तलावावर येऊन बाप्पांना निरोप देताहेत. दुपारपर्यंत इथे जवळपास 250 गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. तलाव परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला आहे. 

Parbhani Ganpati Visarjan : परभणीत आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा अधिक गणपतींचे विसर्जन

Parbhani Ganpati Visarjan : मागील 10  दिवसांपासून मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वत्रच बाप्पाना निरोप दिला जातोय. तर, परभणीत सुद्धा लाडक्या गणपती बाप्पाना निरोप दिलाय जातोय. सकाळपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर सार्वजनिक गणपती असो की, घरगुती गणपती यांचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे याच ठिकाणी शहरातील आणि आसपासच्या सर्व गणपतींचे विसर्जन केले जात आहे. यावेळी परभणीकर कुटुंबासह या तलावावर येऊन बाप्पांना निरोप देताहेत. दुपारपर्यंत इथे जवळपास 250 गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. तलाव परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात गणपती विसर्जनाला सुरुवात

Jalna : जालना शहरातील घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून शहरातील मोती तलाव येथे आपल्या लाडक्या बाप्पाला भाविक निरोप देताना दिसत आहेत. शहरातील मोती तलावालगत कृत्रिम तलावाची महापालिकेच्या वतीने सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी आज जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ यांनी आढावा घेत या ठिकाणी भाविकांना कृतीम तलावामध्ये विसर्जन करण्याची विनंती केली.

Hingoli Ganpati Visarjan: विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा

Hingoli Ganpati Visarjan 2023 : राज्यभरामध्ये आज आनंद चतुर्दशी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक सज्ज आहेत. हिंगोलीत देखील असाच उत्साह पाहायला मिळत आहे. तर, विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पार्श्वभूमी

Marathwada Ganpati Visarjan 2023 Live Updates : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणूक निघत असतात. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात देखील मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक काढल्या जातात. ज्यात जुन्या शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक संस्थान गणपती ते जिल्हा परिषद मैदान या मार्गावरून निघणार आहे. त्यामुळे सकाळी 7 वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मिरवणूक मार्गासह संपूर्ण शहरात तब्बल साडेचार हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने 12 विसर्जन विहिरींसह 4 कृत्रिम तलाव व 47 मूर्ती संकलन केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. तसेच शहरात सुमारे 12 ते 15 महत्वाच्या मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत.


बीड : लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. बीड जिल्ह्यात 1268 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यासाठी गणेश मंडळांसह प्रशासनही सज्ज झाले आहे. तर, गणेशभक्तांनी संभाव्य धोके ओळखून डीजे व गुलाल टाळावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरातील गणेशमूर्ती विसर्जनाचे नियोजन बीड पालिकेने केले असून, कंकालेश्वर मंदिर परिसरातील विहीर आणि खंडेश्वरी बारव येथे मूर्ती विसर्जन करावे. तसेच निर्माल्य बाजूला एका ठिकाणी जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


हिंगोली : जिल्ह्यात देखील आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यंदा 1422 गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना केली. दहा दिवस विविध उपक्रम राबविल्यानंतर आज 1359 सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. भक्तांना गणेशमूर्ती विसर्जन करणे सोयीचे व्हावे यासाठी हिंगोली शहरात जलेश्वर तलाव, सिरेहकशाह बाबा तलाव व कयाधू नदी या तीन विसर्जन घाटांसह लहान मूर्ती विसर्जनासाठी आदर्श महाविद्यालय, तिरुपतीनगर कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिवाजीनगरातील दत्तमंदिर, जुने पालिका कार्यालय, नवीन पालिका कार्यालय, एनटीसी भागातील महेश उद्यान या सात ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवण्यात येणार आहेत.


जालना : शहरात श्रींच्या विसर्जन मिरवणूका आज निघणार असून, या मिरवणुकीत मध्यरात्री 12 वाजेपर्यंतच विविध वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिरवणूक मार्गासह शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, मोती तलाव परिसरात दोन कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत. मोती तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सहा तराफे राहणार असून, महापालिकेच्या दीडशे कर्मचाऱ्यांसह आरोग्य पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. 


लातूर : आपल्या लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. आज निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.  शहरासह जिल्ह्यात यंदा जवळपास 1 हजार 284 गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर, दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.


नांदेड : दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज गणरायाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जन काळात निघणाऱ्या मिरवणुका, गणेश भक्तांचा उत्साह लक्षात घेऊन पोलिस प्रशासन आणि महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. तर, श्री विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाने विशेष जय्यत तयारी केली आहे. चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नानकसर गुरुद्वारा झरी आणि पुयनी खदान या ठिकाणी व्यवस्था केली आहे. तसेच सांगवी आणि पासदगाव येथे कृत्रिम तलाव तयार केले आहेत. गोदावरी आणि आसना नदीच्या घाटावर स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. घाट परिसरात स्वच्छता करण्यात आली असून, रस्त्यांची डागडुजी, बॅरिकेट आणि प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली आहे. मूर्ती संकलन करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात संकलन केंद्र तयार केले आहेत.


परभणी : आज होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे. यामध्ये जिल्ह्यातील 125 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 81 पोलीस अंमलदारांची नेमणूक केली आहे. सोबतच परजिल्ह्यातून दाखल झालेली एक एसआरपीएफची तुकडी, जिल्ह्यातील 770 होमगार्ड यांची सुद्धा नेमणूक आहे. तर, जिल्ह्यात 1 हजार 882 गणपतीची स्थापना सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली आहे.


धाराशिव : शहरात देखील आज मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यंदा शहरात 87 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. यासाठी मुख्य मिरवणूक मार्ग आखून देण्यात आला आहे. शहरातून येणाऱ्या मोठ्या गणेश मंडळासाठी काही अपवाद वगळता जिल्हाधिकारी बंगला किंवा संत गाडगेबाबा चौकातून काळा मारुती चौक, माऊली चौक, नेहरु चौकातून ओंकारेश्वर मंदिर समोरुन देशपांडे स्टैंड तेथून ताजमहल टॉकीज समोरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महात्मा फुले चौकातून विसर्जन विहिरीजवळ येतील. काही गणेश मंडळ बार्शी नाकामार्गे हतलाई देवी तलावाकडे जातील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.