Chhatrapati Sambhajinagar Crime News: मोबाईलमध्ये असलेला लुडो गेम (Ludo Game) सध्या प्रचंड लोकप्रिय झाला असून, तरुण तास-तास त्यावर वेळ घालवतात. मात्र, हाच लुडोचा खेळ एका तरुणाच्या जीवावर उठल्याचा पाहायला मिळाले. कारण लुडो गेमवरून दोन तरुण मित्रांमध्ये वाद झाला. पाहता-पाहता वाद एवढ्या विकोपाला गेला की, काही वेळाने या दोन्ही तरुणांचे कुटुंबीय आपापसात भिडले. शेवटी प्रकरण एवढ्या टोकाला गेलं की, एका तरुणाच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर जिवघेणा चाकूहल्ला केला. तसेच, घरात तोडफोड केली. शहरातील बेगमपुरा ठाण्याच्या हद्दीत जलाल कॉलनीत 7 ऑक्टोबरला ही घटना घडली. यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अधिक माहितीनुसार, जखमी अभिषेक आणि आरोपी आतेफ हे दोघे लहानपणापासूनच चांगले मित्र आहेत. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणेही असायचे. दरम्यान, 7 ऑक्टोबरला रात्री 10 वाजेच्या सुमरास दोघे लुडो गेम खेळत होते. याचवेळी चाल चालविण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करायला सुरवात केली, मात्र, अभिषेकच्या आई-वडिलांनी वाद मिटविला आणि दोघांना शांत केले. 


अन् पुन्हा वाद झाला 


मात्र, त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता आतेफचे वडील शेख आरेफ अभिषेकच्या घराबाहेर पोहचले. अभिषेक-बाहेर ये, तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून त्याला बाहेर बोलवत आवाज दिला. यावेळी अभिषेकच्या घरच्यांनी दरवाजा उघडला. दारात आरेफसह आतेफ, आवेश, रिजवाना, अलमश व तिचा पती आसेफ हे सर्वजण उभं होते. त्याचवेळी आवेश व आतेफ धावत घरात घुसले. त्यांनी अभिषेकला बाहेर ओढत त्याच्या बरगडीजवळ चाकू खुपसला. त्याच्या हातावरही वार केला. या हल्ल्यात अभिषेक जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने चाकू अभिषेकच्या पोटाच्या बाजूला बरगडीजवळ लागला. अन्यथा त्याचा जीव गेला असता. 


पोलिसांत गुन्हा दाखल...


या मारहाणीत अभिषेक शिंदे, आनंद शिंदे, सुनंदा शिंदे हे तिघे माय-लेकरं जखमी आहेत. तर, रिजवाना हिने सुनंदा यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. हे सर्वजण जखमी झाल्यावर आरोपींनी त्यांच्या घराच्या काचा फोडल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सुनंदा रावसाहेब शिंदे (वय 44  वर्षे, रा. जलाल कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून शेख आतेफ, शेख आरेफ, शेख आवेश, शेख आसेफ, शेख रिजवाना आणि शेख अलमश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बेगमपुरा पोलिसांकडून मिळाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kalyan Crime : पायातल्या चपलांनी हल्लेखोराचा शोध, महिलेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला सहा तासांत बेड्या