छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यातील अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील मराठा आरक्षणासाठी आंदोलन आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरातील स्मार्ट सिटी बस सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आयोजित केलेला बागेश्वर बाबा यांचा कार्यक्रम देखील उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील स्मार्ट सिटी बस सेवा मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. शाळा-महाविद्यालयांबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आयोजित केलेला बागेश्वर बाबा यांचा कार्यक्रम देखील उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. धर्माच्या नावाखाली आयोजित केलेला राजकीय कार्यक्रम तत्काळ गुंडाळावा, आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा गनिमी काव्याने कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिला गेला आहे. आंदोलकांनी बागेश्वर दरबार कार्यक्रमाचे शहरात लागलेले काही पोस्टरही फाडले. तसेच अनेक पोस्टरवरील मंत्र्यांच्या फोटोंना काळेही फासण्यात आले आहे. 


प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले.. 


छत्रपती संभाजीनगर शहरात देखील मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागले आहेत. गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय आंदोलकांकडून फोडण्यात आले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत अचानक आंदोलक कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर कार्यालयावर लावण्यात आलेल बोर्ड फोडण्यात आला. सोबतच कार्यालयात असलेल्या काचा, खुर्च्या यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, या तोडफोडीनंतर आंदोलकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने देखील केली. 


पोलीस लक्ष ठेवून... 


मराठवाड्यात आंदोलनाला हिसंक वळण लागल्याने बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता छत्रपती संभाजीनगरचे शहर आणि ग्रामीण पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनावर देखील पोलिसांचे लक्ष आहे. जिल्ह्यात कोणताही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! हिंगोलीत भाजप कार्यालय पेटवून देण्याचं प्रयत्न, घटनास्थळी पोलीस दाखल