Chhatrapati Sambhajinagar Rain: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे. यावेळी सोयगाव तालुक्यात झालेल्या बेफाम पावसामुळे नद्यांना पूर आला असून पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यातील तीन नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.


सोयगाव तालुक्याला पुराचा वेढा


दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात नदी नाले ओसंडून वाहत होते. तालुक्यातील निंबायती गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.


छत्रपती संभाजीनगर शहरातही दुपारी ३.३० वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. साधारण तासभर चाललेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले होते.


पुराच्या पाण्यात दोन बैलांचा मृत्यू


छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वरखेडी बुद्रुक येथील शेतकरी तुकाराम सरिचंद जाधव यांच्या दोन बैलांचा पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झालाय. बैल वाहून गेलेले पाहून गावकऱ्यांनी पाण्यात उतरून बैलांना बाहेर काढले. सात-आठ गावकरी यावेळी पुराच्या पाण्यात उतरले होते.


मुसळधार पावसाने नद्यांना पूर


छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सोना नदी, जरंडी गावातील खडकी नदी आणि निंबायती गावातील सुकी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला. यावेळी रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत असून घरांमध्येही पाणी शिरल्याचे दिसून आले.  यावेळी नागरिकांनी पत्र्याच्या शेडचा आधार घेतल्याचे दिसून आले.


परभणीतही जोरदार पाऊस


परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे जिंतूर-औंढा रोडवरील पाचेगाव येथील नवीन पुलाच्या बांधकामा शेजारी केलेला पर्यायी रस्ताच वाहुन गेला असुन पुलाच्या वरुन पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात जात असल्याने 3-4 तासांपासून या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली.  या मार्गावरून प्रवास करणाऱ्या  नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. तर वाहतुक दारांना पर्यायी जिंतूर परभणी मार्गाने जावे लागत आहे.


मराठवाड्यात पावसाची हजेरी


राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असताना रविवारी रात्री मराठवाड्यातील बीड, धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात रविवारी अनेक भागात ढगाळ वातावरण होते. धाराशिव शहरासह ग्रामीण भागातही रविवारी सायंकाळी जवळपास दीड ते दोन तास जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. दोन दिवसांच्या खंडानंतर शहरात रविवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास प्रचंड उकाडा निर्माण झाला असता तर संध्याकाळी साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाली. 


हेही वाचा:


Marathwada Rain: मराठवाड्यात रविवारी तुफान पाऊस, धाराशिव बीडसह इतर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची हजेरी