Chhatrapati Sambhajinagar: राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असताना रविवारी रात्री मराठवाड्यातील बीड, धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात रविवारी अनेक भागात ढगाळ वातावरण होते. 


 मान्सूननं (Monsoon Updates) संपूर्ण देश व्यापला असून देशातील विविध राज्यांमध्ये काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक भागांत वरुणराजाच्या कोसळणाऱ्या सरींनी अल्हाददायी वातावरण निर्माण झालं आहे. अशातच महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येत्या तीन दिवसात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 


धाराशिवमध्ये दोन तास मुसळधार 


धाराशिव शहरासह ग्रामीण भागातही रविवारी सायंकाळी जवळपास दीड ते दोन तास जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. दोन दिवसांच्या खंडानंतर शहरात रविवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास प्रचंड उकाडा निर्माण झाला असता तर संध्याकाळी साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाली. 


साधारण दीड ते दोन तास जोरदार पावसानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. 


पाच दिवसांच्या खंडानंतर बीडमध्येही मुसळधार 


बीड जिल्ह्यातील विविध भागात रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. जवळपास पाच दिवसांच्या खंडानंतर मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आशादायक स्थिती निर्माण झाली होती. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन नंतर पावसाचा जोर वाढला. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाची हजेरी 


छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी संध्याकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. साधारण तास ते दीड तास झालेल्या पावसाने शहरात ठीक ठिकाणी पाणी साठले होते. मागील चार पाच दिवसांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून भूरभूर पाऊस सुरु आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील ९० टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. रविवारी झालेल्या पावसाने आशादायी चित्र निर्माण झाले असून शेतकरी सुखावला आहे.


हेही वाचा:


Maharashtra Rain: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आजचा दिवसही पावसाचाच, मुंबईतही मुसळधार; कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?


Maharashtra Rain : कोकणात मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट, प्रशासन सतर्क