Chhatrapati Sambhajinagar Water Issue : उन्हाळा सुरु झाला की, छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांना पिण्याचा पाण्याच्या समस्येचा (Drinking Water) सामना करावा लागतो. दरम्यान आता उन्हाळा सुरु होण्यापूर्वी शहरात पाणीपुरवठा सतत विस्कळीत होताना पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात तब्बल पाच वेळा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वेळोवेळी पाणीउपसा थांबून संपूर्ण शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत आहे. सध्या शहरात कुठे नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने तर, कुठे एक दिवस उशिराने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली. 


उन्हाळ्याआधी पाण्याची समस्या


सोमवारी जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सबस्टेशन यार्डमध्ये स्पार्किंग होऊन महापालिकेची पंपिंग बंद झाली. त्याची दुरुस्ती करून पंपिंग पहाटे 3 वाजून 35 मिनिटांनी पूर्ववत सुरू करण्यात आली. त्यामुळे साडेसहा तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. यामुळे मंगळवारी केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारी धूलिवंदनाच्या दिवशी अनेक भागांत पाणीपुरवठा झाला नाही. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागली तर, काहींवर खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली.


वारंवार पाणीपुरवठा खंडीत


मंगळवारी दुपारी फारोळा पंपहाउसमध्ये फॉल्ट होऊन पुन्हा पंपिंग ट्रिप झाली होती. ही दुरुस्ती करण्यासाठी साधारणपणे अकरा तास पाणीपुरवठा बंद होता. या बंदच्या काळात ट्रान्स्फॉर्मर क्र. 2 चे ऑईल लिकेज झाले होते. त्याची तपासणी करून लिकेज दुरुस्तीचे काम मे. ट्रान्सडेल्टा कंपनीमार्फत करण्यात आले. तसेच ट्रान्स्फॉर्मर क्र. 3 चे डीओ फ्युज लिंक शॉर्ट झाले होते. त्यामुळे त्यास मे. ट्रान्सडेल्टा कंपनीमार्फत मेगेरिंग टेस्ट करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्रीपासून पंपिंग पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, याचा फटका शहरवासियांना बसत आहे. त्यात उन्हाचा चटका बसत असल्याने पाण्याची मागणी देखील वाढत आहे. 


महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली.


फारोळा येथील पंपिंग सुरू केल्यानंतर बुधवारी पहाटे चार वाजता जलकुंभात पाणी आलं. ज्या भागाला मंगळवारी पाणीपुरवठा झाला नाही, त्या भागाला दुपारनंतर पाणी दिलं जाणार आहे. मात्र, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! महिलेच्या तोंडात माती टाकून अंगावरील दागिने लुटले; व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना उघडकीस